“उद्धव ठाकरे म्हणाले, झाला का शपथविधी?”, जयंत पाटलांनी सांगितला नवा किस्सा
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दलचा एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितला.
ADVERTISEMENT

महाराष्ट्राची झोप उडवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा ‘मुंबई Tak बैठक’मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दलचा एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितला.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काही झालं तर, भाजपचा प्लान बी तयार आहे, अशी चर्चा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमधून, काँग्रेसमधून काहीजण येऊ शकतात. तुम्ही दोघंही आपापल्या पक्षाचं नेतृत्व करताना याबद्दल काही ग्वाही देऊ शकता का की, आमच्या पक्षातून कुणीही जाणार नाही’, असा प्रश्न विचारण्यात आला.
अशोक चव्हाणांचा जयंत पाटलांना फोन…
या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, “गृहितकांवरील प्रश्नांवर बोलण्यात आज काही अर्थ नाही. शेवटी वास्तव काय घडतंय हे आपण पाहिलं आहे. मागच्या वेळी आम्हालाही धक्का बसला. सकाळी अचानक शपथविधी सुरू झाला, तेव्हा आम्हालाही आश्चर्य वाटलं. त्यादिवशी मी मुंबईत होतो आणि जयंतरावांना मी फोन केला. अहो म्हटलं हे काय चाललंय… शपथविधी आपल्या पक्षाचा चालला की कुणाचा? ते म्हणाले आपला नाही, त्यांचा सुरू आहे. त्यामुळे असे प्रसंग आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे यावर आजकाही बोलणं उचित नाही.”
हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित
पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील म्हणाले, “मला टिव्हीवरच दिसायला लागलं. उद्धव ठाकरेंनीच मला फोन केला. फोन घेतल्यावर ते म्हणाले, ‘झाला का शपथविधी?’ मी म्हटलं कुणाचा? ते म्हणाले, ‘तुमचा नाही झाला का?’ त्यावर मी त्यांना सांगितलं की मी घरीच झोपलेलो आहे. आताच उठलोय. याचं आश्चर्य होतं. पण, अशा गोष्टी घडत राहतात.”