“…तर त्याचे खापर मोदी-शाहांवर फुटेल”, शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून मित्रपक्षांचे कान टोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
ADVERTISEMENT

2024 lok sabha election prediction : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. भाजपसह प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्षाचं लक्ष वेधून घेत काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून मित्रपक्षांचे कान टोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. (Latest update on Maharashtra Politics)
शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “2024 च्या गणिताची आतापासून जुळवाजुळव सुरू झाली आहे. ही जुळवाजुळव फक्त भारतीय जनता पक्षच करतोय असे नाही, तर यावेळी भाजपेतर पक्षही कामास लागले आहेत. भाजपच्या पायाखालची सतरंजी खेचली जात आहे. कर्नाटकच्या निकालामुळे मोदी-शाहांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. दक्षिणेतला एकमेव दरवाजा त्यांच्यासाठी बंद झाला आहे. नव्या संसदेत तामीळनाडूतून खास ‘सन्गोल’ आणला तरी तामिळी जनता ‘हा किंवा तो द्रमुक’ सोडून भलत्या-सलत्यांच्या पाठीमागे पळत नाही हा आतापर्यंतचा इतिहास. त्यामुळे दक्षिणेत भारतीय जनता पक्षाने कर्नाटक हे एकमेव राज्य गमावले हा 2024 च्या तोंडावर अपशकुन आहे.”
“पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे एका शिंद्यांस काँग्रेसमधून फोडून भाजपने मध्य प्रदेशात सरकार बनवले. ते कमालीचे अलोकप्रिय ठरले व भाजप त्यामुळे गाळात जात आहे. छत्तीसगढ पुन्हा काँग्रेसकडेच जाईल. राजस्थानात जादूगार अशोक गेहलोत भाजपास सहजासहजी पुढे जाऊ देणार नाहीत. हे चित्र जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे द्योतक आहे. मोदी-शाह या दुकलीविरोधात देशभरात संताप आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये सोडली तर मोदी-शाहांच्या विरोधात संपूर्ण देश उभा ठाकला आहे”, असं मत अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.
मोदी-शाहांवर हल्ला, विरोधकांना सबुरीचा सल्ला; ठाकरेंनी अग्रलेखात काय काय म्हटलंय?
– “राज्यातील प्रादेशिक पक्षांना व त्यांच्या छत्रसालांना एकत्र बांधण्यासाठी प्रत्येक जण शर्थ करीत आहे. नितीश कुमार यांनी पाटण्यात 12 जून रोजी भाजप वगळून देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी बाहेर पडतील. राजकारणातील सध्याचे गुजरात मॉडेल राष्ट्रहिताचे नाही. सर्वच प्रमुख सरकारी पदांवर, आर्थिक पेढ्यांवर एकाच राज्यातील लोकांची नेमणूक केली जात आहे व देशाचा सर्व आर्थिक ओघ एकाच राज्यात वळवला जात आहे. त्यामुळे ‘गुजरात विरुद्ध संपूर्ण देश’ असा संघर्ष उभा राहिला तर त्याचे खापर मोदी-शाहांवर फुटेल”










