शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुहूर्त
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर फडणवीसांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet Expansion Latest News, Eknath Shinde-Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार जाऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, त्याला आता वर्ष झालं आहे. गेल्या वर्षभरात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने होत राहिल्या. सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही सांगून टाकला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने राज्यात सरकार स्थापन केले. सरकारला वर्षपूर्ण झाले असून, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांचे डोळे विस्ताराकडे लागले आहेत. दरम्यान, मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिल्ली भेटीचं कारण आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्यासंदर्भातील बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा जो आवडता प्रश्न आहे की, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू. तारीख कुणीच सांगत नाही.”