नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”; स्वत:विरोधात जोरदार प्रचार
Maharashtra Politics : नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”; स्वत:विरोधात जोरदार प्रचार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”;
स्वत:विरोधात जोरदार प्रचार
कराड नगरपालिका निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने स्वतःविरोधातच प्रचार करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतलाय. त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार ऍड. श्रीकांत घोडके हे मतदारांच्या भेटीगाठी घेतांना उघडपणे सांगत आहेत— “मला मतदान करू नका!” या विचित्र पण थेट भूमिकेमागे गंभीर कारणे असल्याचे घोडके यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, कराड नगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गावर खुले झाले. मात्र, ही संधी खुली असूनही प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वसाधारण वर्गातील उमेदवार न देता, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे करून मराठा समाजावर अन्याय केला, असा गंभीर आरोप घोडके यांनी केला आहे.
घोडके सांगतात की, स्वतःचे नाव उमेदवारीसाठी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राजकीय वातावरण व निवडणूक प्रक्रियेतील बदलत्या प्रवृत्तींचा बारकाईने आढावा घेतला. त्यांच्या मते, सध्या निवडणुकांच्या माध्यमातून “अयोग्य आणि अपप्रवृत्तींचा शिरकाव” वाढत आहे. पैशांचा वापर, मतलबी राजकारण आणि समाजातील फूट पाडण्याचे प्रयत्न यामुळे खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळत नाही, असे ते म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आरक्षण खुले असूनही राजकीय पक्षांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले. “खुल्या वर्गावर आरक्षण आल्यानंतर नैसर्गिकरित्या सर्वसाधारण वर्गातील उमेदवाराला संधी मिळणे अपेक्षित. पण दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी त्या भावनांचा विचार न करता उमेदवार दिल्याने आमच्या समाजाची अवहेलना झाली,” असे घोडके यांनी मतदारांना सांगितले. याच कारणांवर त्यांनी वैयक्तिक पातळीवर क्षोभ व्यक्त करत उमेदवारी कायम ठेवली असली, तरी प्रत्यक्ष प्रचारात मात्र लोकांना मतदान न करण्याचे आवाहन करून ते एकप्रकारे निवडणूक प्रक्रियेचा निषेधच नोंदवत आहेत.










