अटलजींचा फोन, शिवसेनेचे 40-50 खासदार; संजय राऊतांनी सांगितला 1992 चा किस्सा
2014 नंतर भाजपसोबत युती करायला विरोध होता, याबद्दल भूमिका मांडतांना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद विध्वंसानंतरचा म्हणजेच 1992 नंतरचा किस्सा सांगितला.
ADVERTISEMENT

Mumbai Tak Chavadi : 2014 नंतर भाजपसोबत युती करायला विरोध होता, याबद्दल भूमिका मांडतांना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद विध्वंसानंतरचा म्हणजेच 1992 नंतरचा किस्सा सांगितला. शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उमेदवार मागे घेण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला आणि त्यामुळे कसा फटका बसला याबद्दल राऊतांनी भाष्य केलं.
संजय राऊत यांनी ‘मुंबई Tak चावडी’वर भाजपसोबत जाण्यामुळे शिवसेनेचे कसे नुकसान झाले आणि भाजपने शिवसेनेचा कसा गैरफायदा घेतला याबद्दल भाष्य केले.
हेही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’
खासदार संजय राऊत म्हणाले, “1992 नंतर देशात आणि राज्यात स्वबळावर निवडणुका लढलो असतो, तर नक्कीच राजकारणाचं चित्र बदललं असतं. पण, बाळासाहेब ठाकरे विशाल ह्रदयाचे नेते होते. त्यांनी नेहमी सांगितलं की, भाजप आपल्या विचारांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी विचारांचं विभाजन करू नये. बाबरी प्रकरणानंतर आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थानात आम्ही उमेदवार उभे केले होते.”
अटल बिहारी वाजपेयींचा फोन आला अन् बाळासाहेब म्हणाले…
याच मुद्द्यावर बोलताना पुढे संजय राऊत म्हणाले, “पण, अटलजींचा बाळासाहेब ठाकरेंना फोन आला. ते म्हणाले की, “आप चुनाव लडोगे तो काँग्रेस को फायदा होगा.’ बाळासाहेब ठाकरे म्हणाले मागे घ्या. तेव्हा आम्ही देशात 110 उमेदवार उभे केले होते. ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची, हिंदुत्वाची लाट होती. तेव्हा आमचे महाराष्ट्राबाहेर 40 ते 50 खासदार निवडून आले असते, इतकी बाळासाहेबांची क्रेज आणि शिवसेनेचे नाव त्यावेळी होतं. पण, बाळासाहेब सगळा त्याग करत गेले. त्या त्यागाचा गैरफायदा युतीतील मित्रपक्षाने घेतला.”