‘लहरी राजा’, नव्या संसद भवनावरून शिवसेनेचं (UBT) PM नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि काही विरोधी पक्षाचे नेते अनुपस्थित होते. त्यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमावर काँग्रेससह काही प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीही या कार्यक्रमाला नव्हते. यावरूनच मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले. उद्घाटनानंतरही शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
‘नवा संसद महाल! मोदींचा वास्तू प्रवेश!’, या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कोणी घेऊ नयेत. नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे ‘सब कुछ मोदी आणि फक्त मोदी’ असाच होता. फोटो व इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे. राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी व त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असे चित्र त्या लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात. तसेच ते वागले.”
आठ वर्षांत मोदींनी त्याच संसदेस टाळे ठोकले
“राष्ट्रपती नाहीत, उपराष्ट्रपती नाहीत, विरोधी पक्षनेते नाहीत. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना नाइलाजाने बाजूला ठेवले. ‘नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे हो’ अशी निमंत्रणाची हाळी मारण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून ओम बिर्ला साहेब होते. तर असा हा एकंदरीत कारभार आहे. मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्वतःच जाहीर केले होते की, ‘देशाचे संविधान हाच एकमेव पवित्र ग्रंथ आहे. त्या पवित्र ग्रंथाचा आदर आपले सरकार करेल.’ मोदी यांनी पंतप्रधानपदावर येण्याआधी प्रथम संसदेत प्रवेश केला तेव्हा अत्यंत भावूक होत संसदेच्या पायरीवर डोके टेकवून अश्रू ढाळले. या संसदेचे पावित्र्य राखीन, सगळ्यांना समान न्याय देईन व त्यासाठी संसदेला बळ देईन असे त्यांचे मन त्यांना सांगत असावे, पण फक्त आठ वर्षांत त्यांनी त्याच संसदेस टाळे ठोकले व आपल्या मर्जीने संसदेची नवी इमारत उभी केली. एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसा त्याच्या उद्घाटनाचा सोहळा केला”, असं टीकास्त्र शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान मोदींवर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून डागलं आहे.
हिंदुत्व की राज्याभिषेक सोहळा? मोदींना सवाल
“लोकशाहीच्या या मंदिरातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळय़ास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळय़ात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांड यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. राजदंडही आता आला. म्हणजे यापुढे एक प्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहोचला आहे. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात मोदी आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेकाचा सोहळा?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.