नागपूरकरांनो.. पाहा तुमच्या वॉर्डात नेमकं कोणतं आरक्षण पडलं, आता ठरणार उमेदवार!
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 6 व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी 20 जागा, सर्वसाधारण प्रभागातील 35 राखीव आहेत.
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची मंगळवारी(11 नोव्हेंबर) सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेतील 38 प्रभागातील विविध प्रवर्गातील एकूण 151 जागांपैकी 76 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेत एकूण 151 जागांपैकी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 30 जागा राखीव आहेत. त्यापैकी 15 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जमातीसाठी एकूण 12 जागा राखीव आहेत. त्यापैकी 6 जागा महिलांना राखीव झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 जागा राखीव आहेत. त्यापैकी 20 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. उर्वरित 69 सर्वसाधारण मतदारसंघातील जागांपैकी 35 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत.
हे ही वाचा>> मुंबई महापालिका निवडणूक: पाहा तुमचा वॉर्ड कोणासाठी झालाय आरक्षित?
कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवारी सकाळी आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून दिली. आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली. आरक्षित असलेल्या प्रभागांची नावे उपस्थितांना दाखविण्यात आली व ते एका पारदर्शक काचेच्या पेटीत टाकण्यात आली. मनपाच्या नेताजी शाळांच्या मुलांच्या हातांनी सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा क्रमाने ही आरक्षण सोडत काढण्यात आली.










