'सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी..', रोहित पवारांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Facebook Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अघोरी पूजेबाबत केलेल्या खळबळजनक ट्विटनंतर आता आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात उडी घेतली असून अजित पवार यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी..',
रोहित पवारांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Facebook Post : अशोक खरातची विकृती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'भोंदूगिरी' आणि 'अघोरी पूजा' या विषयावरून मोठा गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाजमाध्यमावर काही तारखा आणि पुरावे सादर करत गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, 18 ते 20 नोव्हेंबर 2025 या काळात शिवरात्री आणि अमावस्येचे औचित्य साधून सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजेचा प्रकार घडला आहे. यामध्ये कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला असून, भिगवण रोडवरील शिवलिका आश्रमात अशा प्रकारच्या अघोरी प्रथा पार पाडल्या गेल्याचे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
राजकीय राक्षसांची सुपारी आणि अघोरी विद्येचा वापर
अमोल मिटकरी यांच्या या दाव्याला दुजोरा देत आमदार रोहित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा भोंदूगिरीला जागा नाही, असे स्पष्ट करत रोहित पवार यांनी या प्रकरणातील 'राजकीय राक्षसांचा' शोध घेण्याची मागणी केली आहे. अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर आणि देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा जादूटोणा नेमका कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला आणि यामागे कोणत्या राजकीय नेत्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा दडली आहे, असा रोकठोक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : 'रुपाली चाकणकरांना अटक करुन नार्को टेस्ट करा' सुषमा अंधारेंची मागणी; एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाल्या?
पवार कुटुंबाला सतर्कतेचा इशारा आणि तपासाची मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच पार्थ आणि जय पवार यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. "आजचे बेभरवशी राजकारण चांगले राहिलेले नाही, त्यामुळे सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी सतर्क राहावे," असे भावनिक पण सूचक विधान त्यांनी ट्विटमध्ये केले आहे. तसेच, 27 जानेवारी रोजी संबंधित भोंदू व्यक्तीची निगडित लोक देवगिरी बंगल्यावर आले होते का? आणि या काळात खरात याच्याशी जवळीक असणारे कोणते राजकीय लोक बंगल्यावर संपर्कात होते? याची सखोल चौकशी गृहविभागाने करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.










