दादा गटाचे 'ते' 22 आमदार अन् शरद पवारांचं सूचक मौन; NCP SP च्या बैठकीत काय घडलं?

मुंबई तक

Sharad Pawar NCP meeting discussion : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी प्रश्न उपस्थित केले असून, खासदार शरद पवारांनी याबाबत सूचक मैन बाळगल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

NCP SP meeting Update
NCP SP meeting Update
google news

बातम्या हायलाइट

point

दादा गटाचे 'ते' 22 आमदार अन् शरद पवारांचं सूचक मौन

point

NCP SP च्या बैठकीत काय घडलं?

Sharad Pawar NCP meeting discussion :  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची आज (दि.20) मुंबईत अतिशय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या (merger) मुद्द्यावरून आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.  जेव्हा आमदारांनी विलीनीकरणाच्या संदर्भातील चर्चांवर विचारणा केली, तेव्हा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर सूचक मौन बाळगले. शरद पवारांच्या या मौनामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या काही आमदारांमध्ये स्पष्टपणे नाराजी पाहायला मिळाली. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमधील आणि नेत्यांमधील संभ्रम पूर्णपणे दूर करण्यासाठी स्वतः शरद पवारांनी या विषयावर आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी, अशी आग्रही इच्छा आमदारांनी बैठकीत व्यक्त केली.

हेही वाचा : शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाई सुरुवात, दोन मालमत्ता सील

पक्षातील अंतर्गत घडामोडींवर चर्चा रंगत असतानाच, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची ही सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील यावर अधिकृत भाष्य करत, यापुढे विलीनीकरणाच्या अशा कोणत्याही चर्चेला पूर्णविराम असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. याच भेटीमुळेच चर्चेला मोठे उधाण आले होते. त्यातच अजित पवार गटामध्ये सध्या तटकरे आणि पटेल यांच्याविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने, आपल्या पक्षाची या विषयावरील भूमिका अगदी स्पष्ट असावी, असा आमदारांचा बैठकीत मुख्य आग्रह होता.

अजित पवार गटातील 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

या संपूर्ण घडामोडींदरम्यान सूत्रांकडून अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील जवळपास 22 आमदारांनी आतापर्यंत शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली आहे. अजित पवार गटातील अंतर्गत वादांमुळे आणि मतभेदांमुळे तेथील काही आमदार प्रचंड नाराज असून, हे नाराज असलेले आमदार भविष्यात कोणत्याही क्षणी अजित पवार यांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

 कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचे आव्हान

बैठकीत झालेल्या या सविस्तर चर्चेनंतर आता पक्षाच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या संशयास्पद चर्चांमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजित पवार गटातील आमदारांच्या भेटीमुळे आणि शरद पवारांच्या सूचक मौनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

हे वाचलं का?