नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट
शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते”, असं म्हणत शरद पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT

लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत शरद पवार यांनी बऱ्याच मुद्द्यांवर भूमिका मांडली असून, काही गौप्यस्फोट केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी नरेंद्र मोदी अनुकूल होते, असा गौप्यस्फोट पवारांनी केला आहे.
2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेना भाजपत दुरावा येण्यास सुरुवात झाली. याच काळात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचा खुलासा अखेर झाला. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात भेटीचा उल्लेख केलेला असून, मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास जास्त अनुकूल होते, असा दावा पवारांनी केला आहे. त्यामुळे नवा मुद्दा समोर आला आहे.
शरद पवार यांनी आत्मचरित्रात अनेक पडद्यामागील राजकीय घटनांचा उलगडा केला असून, नरेंद्र मोदींची भेट घेण्याबद्दलही खुलासा केला आहे.
‘लोक माझे सांगाती’, शरद पवारांनी काय म्हटलंय?
“2019 च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता.”