शरद पवारांची ‘ती’ मुलाखत, अजित पवार खरंच नॉट रिचेबल?; पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (7 एप्रिल) एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन गौतम अदाणी यांची बरीच पाठराखण केली. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. याआधी शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच सावरकरांबाबत केलेलं भाष्य आणि आता अदाणीची पाठराखण यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा नॉट […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (7 एप्रिल) एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन गौतम अदाणी यांची बरीच पाठराखण केली. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. याआधी शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच सावरकरांबाबत केलेलं भाष्य आणि आता अदाणीची पाठराखण यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशी सध्या कुजबूज सुरू झाली आहे.
काल अजित पवार हे पुण्यात होते. पण अचानक त्यांनी पुण्यातील कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल असल्याचं समजतं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना आता आपच्या माजी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका ट्विटमुळे तर वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.
अंजली दमानियांचं नेमकं काय ट्विट?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट करून अंजली दमानिया यांनी ‘किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन’ असं कॅप्शन दिलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
किळसवाणी राजकारण
मी पुन्हा येईन pic.twitter.com/mGY1k2720i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 7, 2023
अंजली दमानिया यांच्या ट्विटनंतर अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांनी तर अधिकच जोर धरला आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार खरंच नॉट रिचेबल?
अजित पवार हे जेव्हा-जेव्हा नॉट रिचेबल होतात तेव्हा-तेव्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होतो हे आजवर महाराष्ट्राला पाहायला मिळालं आहे. मग ते पहाटेचा शपथविधी असो किंवा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा.. त्यामुळेच काल अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा होती. कारण त्यांनी आपले पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केले होते. मात्र, अजित पवार हे नॉट रिचेबल नाहीत. कारण त्यांनी पुण्यातील एका सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याला काही वेळापूर्वीच सपत्नीक हजेरी लावली. याशिवाय आज (8 मार्च) सकाळी 10.30 वाजता ते चिंचवडमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे काल अचानक अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची जी चर्चा रंगली होती. त्यावर सध्या तरी पडदा पडला आहे. मात्र, या सगळ्या चर्चेमुळे पडद्यामागे काही तरी जोरदार हालचाली सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
शरद पवाराकंडून अदाणींची पाठराखण, ‘त्या’ मुलाखतीनंतर उंचावल्या भुवया
दरम्यान, शरद पवार यांनी काल दिलेल्या मुलाखतीत उद्योजक गौतम अदाणी यांची पाठराखण केली. एकीकडे काँग्रेस अदाणींविरोधात रान उठवत असताना त्यांच्यासोबत युतीत असणाऱ्या शरद पवारांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण अदाणींच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना खिंडीत गाठू पाहत आहेत. मात्र, शरद पवार यांनी अदाणींची पाठराखण केल्याने नव्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. याच मुलाखतीनंतर अवघ्या काही तासात अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू झाली होती. ज्यामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होतो की काय असे अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून वर्तवले गेले.
शरद पवार त्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते?
काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अदाणी समूहाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, तुम्ही ज्या लोकांना लक्ष्य करत आहात, त्यांनी काही चूक केली असेल, अधिकारांचा गैरवापर केला असेल तर लोकशाहीत तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा 100 टक्के अधिकार आहे, पण काहीही अर्थ नसताना हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही. पवार पुढे म्हणाले, “आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे, देशाला त्याची गरज नाही का? विजेच्या क्षेत्रात अदाणी यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. देशाला विजेची गरज नाही का? जबाबदारी स्वीकारून देशाचे नाव उंचावणारे हे लोक आहेत.
या उद्योगपतींनी चूक केली असेल, तर तुम्ही हल्ला करा, पण त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. विविध दृष्टिकोन असू शकतात, टीका होऊ शकते. सरकारच्या धोरणांवर ठामपणे बोलण्याचा अधिकार आहे, पण चर्चाही व्हायला हवी. कोणत्याही लोकशाहीत चर्चा आणि संवाद खूप महत्त्वाचा असतो, चर्चा आणि संवादाकडे दुर्लक्ष केल्यास व्यवस्था धोक्यात येईल, ती नष्ट होईल. आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत. हे आपण समजून घेतले पाहिजे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी विरोधकांची मागणी होती. पण संयुक्त संसदीय समितीने हा मुद्दा सुटणारा नव्हता. ही समिती नेमली तर देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असते. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होती, त्यामुळे चौकशीसाठी नेमलेल्या समितीत सत्ताधारी पक्षाचं बहुमत असेल, तर सत्य कसं बाहेर येईल? हा चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयावर कोणीही प्रभाव टाकू शकत नाही, त्यांनी चौकशी केली, तर सत्य समोर येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चौकशीची घोषणा केल्यानंतर संयुक्त संसदीय समिती चौकशीचे महत्त्व राहिले नाही. संयुक्त संसदीय समिती चौकशीसाठी पुढे जाण्यामागे काँग्रेसचा हेतू काय होता? यावर त्यांचा विश्वास होता का? या प्रश्नांबाबत मी सांगू शकत नाही, परंतु मला माहित आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नियुक्त केलेली समिती खूप महत्वाची होती.
शरद पवार यांनी राहुल गांधींच्या ‘अदाणी-अंबानी’ या बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या शैलीशी सहमत नसल्याचे स्पष्ट केलं. भूतकाळातील “टाटा-बिर्ला” कथेचा संदर्भ देत ते म्हणाले की “आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाटा-बिर्ला यांच्यावरुन हल्लाबोल करायचो.पण या देशात टाटांचं योगदान किती आहे हे नंतर कळलं. आजकाल टाटा-बिर्ला ऐवजी अदाणी-अंबानींवर हल्ले होत आहेत. अदाणी यांनी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असं म्हणतं त्यांनी अदाणी समूहाचं तोंडभरुन कौतुक केलं.
ADVERTISEMENT