India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!
नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आहे. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
ADVERTISEMENT

India Alliance coordination committee first meeting In Delhi : विरोधी पक्षांची आघाडी भारतीय राष्ट्रीय सर्वसमावेशक विकास आघाडी म्हणजेच इंडिया अलायन्सने घटक पक्षांमधील सुसंवादासाठी एक समन्वय समिती स्थापन केलीये. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी होतेय. इंडिया आघाडीची रणनीती आणि भविष्यातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी होणाऱ्या समन्वय समितीच्या या बैठकीला अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत.
ईडीने अभिषेक बॅनर्जींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे समितीच्या या पहिल्या बैठकीत 13 सदस्य सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया आघाडी बळकट करण्यासाठी आणि चांगला समन्वय ठेवायचा असेल, तर 13 प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आघाडीच्या समन्वय समितीसमोर मोठे आव्हान असेल.
ममता विरुद्ध अधीर यांच्यातील युद्धविराम कसा होणार?
पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी पाटणा येथील पहिल्या बैठकीनंतरही टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. अधीर रंजन चौधरी आता G-20 डिनरवरून ममतांना लक्ष्य करत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, JDU नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, JMM नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील G-20 डिनरला उपस्थित होते. तरीही अधीर फक्त ममता बॅनर्जींनाच का टार्गेट करत आहे? या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा मार्ग समन्वय समितीला शोधावा लागणार आहे.
हेही वाचा >> शिवसेना-भाजपत ठिणगी, भाजप आमदाराचा थेट एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदेंवर आरोप
बंगालमध्ये डावे आणि टीएमसीमधील जुने वैर कसे मिटणार?
पश्चिम बंगालमध्ये डावे आणि टीएमसीमधील जुने वैर कसे सोडवले जाईल? याचे उत्तर शोधणे समन्वय समितीसाठी सोपे नाही. डावे पक्ष जुने वैर विसरायला तयार नाहीत आणि पश्चिम बंगालमध्ये टीएमसीसोबत युती होऊ शकत नाही असे डावे नेते वारंवार सांगत आहेत. त्याची प्रचिती धुपगुरी पोटनिवडणुकीतही दिसली. इथे इंडिया आघाडीच्या तीन घटक पक्षांचे दोन उमेदवार रिंगणात होते. टीएमसीच्या विरोधात डाव्यांनी उमेदवार उभा केला होता, त्याला काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.