गरब्यात मुस्लिमांना बंदी : ‘…तर PM मोदींची जास्त पंचाईत होईल’, ठाकरेंचा हल्ला
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नाही, यामुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. काही ठिकाणी लव्ह जिहादशी कनेक्शन जोडत ही भूमिका घेतली गेली आहे. पण, यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीका केली आहे.
ADVERTISEMENT

“गरब्यात मुसलमानांना प्रवेश नाही हे धोरण असेल तर बाटग्यांनी तसा कायदा मंजूर करून घेण्याची हिंमत दाखवावी”, असे आव्हान देत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपला लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदी-अमित शाहांसह शिवसेनेने (युबीटी) हल्ला चढवला.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, “काही बाटगे हे खऱ्या मुसलमानांपेक्षा जोरात बांग देतात. भाजपमध्ये शिरलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांचेही तसेच आहे. कालपर्यंत जे हिंदुत्वास लाथा घालत होते, ते आता भाजपच्या तंबूत शिरून हिंदुत्वाच्या घंटा जोरात बडवू लागले आहेत. या वेळी गरब्याच्या कार्यक्रमात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची भूमिका भाजपमधील बाटग्यांनी घेतली. गरबा उत्सवात आयोजकांनी आधारकार्ड वगैरे तपासून केवळ हिंदूंनाच प्रवेश मिळावा असे या मंडळींनी जाहीर केले.”
हेही वाचा >> Ajit Pawar यांचा मोठा निर्णय, बँक संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा
“मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन होते व केंद्रात मोदी-शाहांच्या राजकीय टिपऱ्या घुमायला लागल्यापासून मुंबईतील गरब्यास जरा जास्तच जोर चढला आहे. हिंदुत्वात भेसळ झाली की, मेंदूत बिघाड होतो. कुठेही, कसेही मारून मुटकून हिंदुत्व घुसवायचे असे सध्या चालले आहे. ज्यांना गरबा खेळायचा असेल त्यांनी ‘घर वापसी’ करून हिंदू धर्मात प्रवेश करावा अशी अट हिंदू बाटग्यांनी घातली. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाच्या बाबतीत जो वैचारिक गोंधळ उडाला आहे, त्याचाच हा नमुना आहे”, असं टीकास्त्र शिवसेनेने (युबीटी) डागलं आहे.
बाटगे हिंदुत्वाची धार बोथट करताहेत
“आजचा गरबा हा ‘मारू मुलुंड’ किंवा ‘मारू घाटकोपर’ असा वाद करणाऱ्यांचा आहे व अशा गरब्यातच ‘आधारकार्ड’ तपासून प्रवेश देण्याचा खेळ होऊ शकतो. हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव हे राष्ट्रीय एकात्मतेस महत्त्व देणारे आहेत व ते तसेच असायला हवेत. गरब्याच्या मांडवात आता व्यापारीकरण झाले. तेथे कोट्यवधी रुपयांची उधळण होते, नट-नट्यांचा झगमगाट होतो व ‘मारू घाटकोपर’वाल्यांचे नेते व्यासपीठावर ठाण मांडतात. यात दुर्गापूजेचे मांगल्य कोठे आहे? गरब्यात हिंदूंनाच प्रवेश ही जी टूम काढून बाटगे स्वतःचे ज्ञान पाजळत आहेत ते हिंदुत्वाची व्याख्या व धार बोथट करीत आहेत”, असं शिवसेनेने (युबीटी) म्हटले आहे.