Manipur: ‘..तर ‘त्या’ विषयावर पंतप्रधान मोदींनी तोंड उघडलं नसतं’, ठाकरेंची सडकून टीका
मणिपूरमध्ये हिंसाचार अद्यापही सुरूच आहेत. तसंच दोन महिलांची करण्यात आलेली विटंबना यामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: मणिपूरमधील (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कारची (Gang Rape) घटना समोर आल्यानंतर या प्रकरणी संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देखील आपल्या मनात चीड असल्याचं म्हणत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. याच सगळ्या मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करण्यात आली आहे. (violence continues in manipur desecration of two women video anger expressed entire country saamana editorial strongly criticized modi government)
ADVERTISEMENT
पाहा सामनाच्या अग्रलेखात मणिपूरच्या हिंसाचारावरुन मोदी सरकारवर नेमकी काय टीका केलीए:
- मणिपूर हिंसाचाराची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली नसती तर त्या गंभीर विषयावर पंतप्रधान मोदी यांनीही तोंड उघडले नसते. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले. ‘‘दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात येत असल्याची चित्रफीत अस्वस्थ करणारी असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी. अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करील,’’ असे न्यायालयाने खडसावले व मणिपूर हिंसाचारावरचे 80 दिवसांचे मौन पंतप्रधानांना सोडावे लागले.
- संवेदनशील मनाचा थरकाप उडविणाऱ्या एका व्हिडीओने पंतप्रधानांना मणिपूर हिंसाचारावरील ‘मौनभंग’ करण्यास भाग पाडले. अर्थात, ते जे थोडेफारच बोलले तेदेखील नेहमीप्रमाणे मूळ मुद्दा भरकटविणारे होते. अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही असे पंतप्रधान म्हणाले. आता माफ करणार नाही म्हणजे काय? भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, ये मोदी की गॅरंटी है, असे ते म्हणाले व दुसऱ्याच दिवशी अनेक तालेवार भ्रष्टाचारी त्यांनी भाजपात सामील करून त्यांना मंत्री वगैरे बनवले. त्यामुळे पंतप्रधानांचे बोलणे किती गांभीर्याने घ्यायचे?
- मणिपुरात 80 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. त्यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेने मानवता शर्मसार झाली. जगभरात देशाच्या इभ्रतीस कलंक लागला, पण मोदी व त्यांचे सरकार या विषयावर संसदेत चर्चा घडवायला तयार नाही. मणिपुरात आतापर्यंत 10 हजार घरे जाळण्यात आली. 60 हजारांवर लोक निर्वासित छावण्यांत राहत आहेत. तेथे खाण्यापिण्याचे हालच हाल आहेत. त्या छावण्यांत विजेचीही सोय नाही. इतक्या भयानक अवस्थेत मणिपूरचे लोक जीवन जगत आहेत.
- स्वतंत्र भारतातील भयानक हिंसाचार व हत्याकांड मणिपुरात सुरू आहे व देशाची संसद पंतप्रधानांसह या विषयावर मूकबधिर बनून बसली आहे. कश्मीरपेक्षा भयंकर हिंसा व अत्याचार मणिपुरात सुरू आहेत, पण कश्मीरप्रश्नी हिंदू-मुसलमान किंवा हिंदुस्थान-पाकिस्तान असे राजकारण करणारे ‘भाजप महामंडळेश्वर’ मणिपुरात जाऊन शांतता प्रस्थापित करायला तयार नाहीत. केंद्रीय सुरक्षा दलाचे 60 हजार जवान मणिपुरात तैनात आहेत, तरीही हिंसाचार थांबत नाही. याचा अर्थ पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेली आहे.
- आता 26 राजकीय पक्षांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्या इंडियाचे हे नग्न चित्र आहे. म्हणून ‘इंडिया’ वाचविण्यासाठी सगळय़ांनी एकत्र व्हायला हवे. एका बाजूला कंगना राणावत ही अभिनेत्री केंद्र सरकारच्या विशेष सुरक्षा व्यवस्थेत ऐटीत वावरताना दिसते, तर त्याच वेळेला मणिपुरात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड भररस्त्यावर काढली जाते. त्या महिलांना कोणाचेही संरक्षण नाही.
हे ही वाचा >> Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?
- मोदींचा भारत हा असा आहे. सरकारच्या टाळकुटय़ांच्या संरक्षणासाठी उद्या भारतीय जवानही पुरवले जातील, पण ज्यांना खरेच संरक्षण द्यायचे त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांची धिंड काढणाऱ्यांना पकडले. मग दोन महिने ते काय झोपले होते? मणिपुरात अशा घटना नेहमीच घडतात, असे निर्लज्ज विधान त्यांनी केले व तरीही भाजप या मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेत आहे.
- मणिपुरात बिगर भाजपशासित सरकार असते तर एव्हाना ते बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लावले असते. महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखे सरकार नव्हते म्हणून खोक्यांच्या मदतीने‘ठाकरे सरकार’ पाडले, पण महिलांची नग्न धिंड उघड्या डोळय़ाने सहन करणारे मुख्यमंत्री वीरेन सिंह आजही मणिपूरच्या सिंहासनावर विराजमान आहेत.
- आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी महागाईचे खापर मुसलमानांवर फोडले, पण ते मणिपूरच्या हिंसाचाराचे खापर त्यांच्या सरकारवर फोडायला तयार नाहीत. कारण मणिपुरातील हिंसाचारात मुसलमान कोठेच नाही. त्यामुळे मोदी, हेमंत बिस्व सर्मा व समस्त भाजप परिवाराची गोची झाली आहे. मणिपूरच्या हिंसाचाराबाबत युरोपियन संसदेत चर्चा झाली व हिंदुस्थानवर टीका झाली. मणिपूरची हिंसा ही भारताची अंतर्गत बाब आहे व त्यात उपऱ्या राष्ट्रांनी ढवळाढवळ करू नये; पण परराष्ट्रातील संसदेत यावर चर्चा करण्याची वेळ का यावी? मणिपूर हे राजकीयदृष्टय़ा फायद्याचे राज्य नसल्याने मोदी तेथील घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत हाच त्यामागचा सरळसोट अर्थ.
हे ही वाचा >> Video :झिंज्या उपटल्या, लाथा-बुक्यांनी मारलं, महिला पायलटला जमावाने मारहाण का केली?
- मणिपुरातील अतिरेकी शक्तींना चिनी ड्रॅगनचे पाठबळ असल्याचे उघड झाले आहे. हिंसाचारावर तोंड न उघडण्याचे व कारवाईस घाबरण्याचे ते एक कारण आहे काय? मागील काही काळात ‘ताश्कंद फाइल्स’, महिलांचे केरळमधील धर्मांतर, त्यांचा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतील सहभाग यावर ‘दी केरला स्टोरी’, कश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर ‘दी कश्मीर फाइल्स’ असे चित्रपट मधल्या काळात एका अजेंडय़ाप्रमाणे निर्माण केले गेले. या मंडळींनी आता मणिपूरमधील हिंसाचारावरही ‘मणिपूर फाइल्स’ असा चित्रपट काढावा. ‘केरला स्टोरी’चे ‘पब्लिक शो’ लावणारे भाजपवाले ‘मणिपूर फाइल्स’चे असेच सार्वजनिक शो लावण्याची हिंमत दाखवतील का? पंतप्रधान ‘मणिपूर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्याचे धाडस दाखवतील का?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT