एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पद गमावलं तर काय? जनतेने दिला ‘हा’ कौल
जर या क्षणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पद गमावलं तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कशी असेल याबाबतच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. जाणून घ्या याच सर्व्हेविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे आहे. एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपद (Post of Chief Minister) औटघटकेचं ठरणार असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे अजित पवारही बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या चर्चा आहेत. याच सगळ्या घडामोडींच्या, चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या मनात काय, जनतेला काय वाटतं, याची माहिती समोर आली आहे. सत्तांतर झालं, तर कोण कोणासोबत जाईल, सत्तेची मिसळ कशी तयार होईल? याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया. (what will happen if eknath shinde loses the post of chief minister what did the public say from the survey)
ADVERTISEMENT
2019 चा निकाल आला तेव्हापासूनच महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत अस्थिर, चंचल बनलं आहे. तीन वर्षांतच महाराष्ट्राने 3 मुख्यमंत्री पाहिले. उरलेल्या दोन-पावणेदोन वर्षांत आणखी किती मुख्यमंत्री बघायला मिळतील, याची शाश्वती नाही. अशातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी किंवा निकालानंतर पुन्हा नवी जुळवाजुळव होईल, असं म्हटलं जात आहे.
ही झाली राजकारण्यांची बंद दाराआडची डील. पण लोकशाही या सगळ्या डीलला जनता उत्तर देत असते. सत्तेची डील केली, पण ही डील जनतेला पटली नाही, तर होत्याचं नव्हतं होतं. आणि हाच जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्व्हेतून समोर आला आहे.
हे वाचलं का?
ख्यातनाम सर्वेक्षण संस्था सी-वोटरने एबीपी नेटवर्कसाठी केलेल्या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार झाले तर, काय समीकरणं असेल याचा अंदाज जाणून घेण्यात आला.
सी-वोटरच्या सर्व्हेत नेमकं काय म्हटलंय?
सर्व्हेतल्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास 19 टक्के लोकांना शिंदेंनी पुन्हा ठाकरेंशी हातमिळवणी करावी, असं वाटतंय. तर 19 टक्केच लोकांना महाविकास आघाडी सत्तेत येईल, असं वाटतंय. पण सर्वाधिक 32 टक्के लोकांना शिंदे पायउतार झाल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक घ्यावी, असा कल दिसतो आहे. तर निव्वळ 12 टक्के लोकांचा भाजप आणि पवार हातमिळवणी करतील, असा कल आहे. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा कल इंटरेस्टिंग आहे.
ADVERTISEMENT
सी-वोटरच्या या सर्व्हेतली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वाधिक लोकांना महाराष्ट्रात मध्यावधी लागेल असं वाटतं. महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्रीबदल नाही, तर मध्यावधीच्या मूडमध्ये असल्याचं दिसते आहे.
ADVERTISEMENT
सी-वोटरचा हा सर्व्हे महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडाची चर्चा सुरू असतानाच करण्यात आला. सोमवारी 24 एप्रिल ते बुधवारी 26 एप्रिल या कालावधीमध्ये हा सर्व्हे झाला. सर्वेक्षणातील अंदाजामध्ये तीन ते पाच टक्के बदल होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.
पण या सर्व्हेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही बातमीच्या खाली कमेंट करूनही मत मांडू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT