मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?
येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या आधी केसीआर महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहेत. त्यातच केसीआर यांना वंचित बहुजन आघाडीची देखील साथ मिळू शकते.
ADVERTISEMENT

Maharashtra political news latest : गेल्या काही दिवासांपासून महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांपासून ते गावांपर्यंत एकाच व्यक्तीचे फ्लेक्स दिसून येतायेत. ‘अबकी बार किसान सरकार’ असं लिहिलेले फ्लेक्स नाक्यानाक्यावर लागायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याचे फ्लेक्स असतील, तर ते तसं नाहीये. हे फ्लेक्स आहेत तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वेसर्वा केसी राव यांचे. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या आधी केसीआर महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहेत. त्यातच केसीआर यांना वंचित बहुजन आघाडीची देखील साथ मिळू शकते. त्यामुळे केसीआर आणि वंचितचा नेमका कुणाला फटका बसू शकतो, हे दोन्ही पक्ष कुणासाठी घातक ठरू शकतात? हेच सामजावून घेऊयात…
केसीआर यांनी नांदेडमध्ये सभा घेतली होती. या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले. नांदेडसोबतच राज्यातील इतर ठिकाणी देखील त्यांनी सभा आणि विविध कार्यक्रम घेतले. आता आषाढी वारीला देखील विठ्ठलाच्या दर्शनाला केसीआर येणार आहेत. केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्याबद्दल फडणवीस म्हणाले, “पंढरपुरात सगळ्यांचं स्वागत आहे परंतु कोणी राजकारण करु नये.” राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी केसीआर यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या सहभागाबाबत इशारा दिला. त्यामुळे केसीआर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
प्रकाश आंबेडकर-केसी राव एकत्र येणार?
लोकसभेच्या निवडणुका या वर्षभरावर आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तिकडे विरोधकांनी पाटण्यात बैठक देखील आयोजित केली आहे. अशावेळी वंचितच्या साथीने केसीआर हे महाराष्ट्रात देखील त्यांची पाऊल रोवू लागले आहेत. तेलंगणामध्ये केसीआर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होतं. त्यामुळे केसीआर आणि प्रकाश आंबेडकर येत्या काळात एकत्र येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच ‘कार्यक्रम’, शरद पवारांच्या खेळीचा अर्थ काय?
त्यातच मागच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा तसेच विधानसभेत मोठ्याप्रमाणार मतं घेतली होती. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांचा फटका बसला होता. त्याचबरोबर वंचितच्या उमेदवारांनी लोकसभेला लाखांमध्ये मतं घेतल्याने वंचितने आपली ताकद देखील दाखवून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबत युती केली आहे. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्याबाबात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुकूल दिसत नाही. आता केसीआर आणि वंचित एकत्र आल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणावर बसू शकतो.