'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण'वर कोणाचा हक्क? सुप्रीम कोर्टात शिंदे vs ठाकरेंमध्ये Final सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आता अंतिम सुनावणी होणार आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून (21 जानेवारी) अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे.
सुप्रीम कोर्टात असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा नेमका वाद काय?
1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचं नावा आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरूअसलेल्या वादावर आणि सर्वोच्च न्यायालय अंतिम सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर कोणाचा हक्क असेल हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून निश्चित होईल. हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे राहील की ते उद्धव ठाकरेंना परत केले जाईल हे स्पष्ट होईल?
हे ही वाचा>> मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं, भाजप अन् शिंदेसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची होणार बैठक, पाहा काय घडलं?
2022 च्या पक्षांतर संकटातून उद्भवलेल्या राजकीय लढाईतील अंतिम अध्याय असलेल्या या ऐतिहासिक सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश असलेले सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ हे मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर अंतिम युक्तिवाद ऐकणार आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल करतील.
या वादाचे मूळ 2022 च्या पक्षांतरात
या वादाचे मूळ 2022 च्या शिवसेनेतील पक्षांतरात आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले होते. यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे युती) सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांसह भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. या सरकारमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.










