Shiv Sena : ‘मुख्यमंत्री शिंदे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत’, ठाकरेंच्या सेनेनं डिवचलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच राज्यात भाजपचा प्रचार करणार आहेत. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs Eknath shinde : “शिंदे हे सुसंगत विचाराबाबत कधीच प्रख्यात नव्हते. मुळात शिवसेनेचे विचार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजली नाही. म्हणूनच ते पाच राज्यांत भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत”, असं म्हणत शिवसेनेने (युबीटी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी पकडलं आहे. मुख्यमंत्री शिंदे पाच राज्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याच्या मुद्द्यावरून सेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीकेचे बाण डागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. भाजपचा प्रचार शिंदे करणार असून, यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदेंना लक्ष्य केले आहे. “अल्लाबक्ष प्रचारास निघाले” या सामना अग्रलेखातून शिंदेंना टोले लगावले आहेत.
“राज्याचे बेकायदा मुख्यमंत्री शिंदे यांचे अनधिकृत राजकारण 31 डिसेंबरनंतर संपणार आहे. खोक्यांचे वाटप करून सत्ता तर मिळवली, पण त्याच मार्गाने यापुढे सत्तेचा डोलारा टिकवता येणार नाही याची खात्री झाल्याने त्यांची मनःस्थिती ऐन दिवाळीत साफ बिघडली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची एक गंमत आहे. ते स्वतःला शिवसेनेचे नेते वगैरे समजतात. त्यांच्याबरोबर असलेल्या 40 आमदारांचे व 10-12 खासदारांचे टोळके म्हणजे शिवसेना असा त्यांचा दावा आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अशा अनेक टोळ्या, टोळधाडी आल्या व नामशेष झाल्या. मिंधे टोळीचे तेच हाल होतील”, असं भाकित शिवसेनेने (युबीटी) केले आहे.
१४ महापालिकांच्या निवडणुका… शिंदे आणि भाजपला टोला
“गंमत अशी की, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे आता भाजपसाठी चार राज्यांत विधानसभा निवडणुकांचा प्रचार करणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांत भाजप विजयासाठी ठाण्यातील डुप्लिकेट सेना प्रचारात उतरणार ही गंमतच आहे. भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद पैशाच्या मस्तीत आहे. पैसा, सत्ता व तपास यंत्रणा यामुळेच भाजपचा जय होतो व तेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. विचार, धोरण वगैरे नगण्य आहे. त्यामुळे शिंदे यांचे चार राज्यांत प्रचाराला जाणे हे समजण्यासारखे आहे. शिंदे व त्यांचे टोळके चार राज्यांत प्रचारास जाईल, पण हेच लोक मुंबई, ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. ही सुद्धा गंमत आहे”, असा टोला ठाकरेंच्या सेनेने भाजप आणि शिंदेंना लगावला आहे.