शिवरायांची जगदंबा तलवार भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; सुधीर मुनगंटीवारांची माहिती

या तलवारीसाठी ऋषी सुनकही यांना विनंती करणार असल्याचं मुनगंटीवर यांनी सांगितलं.
Rishi Sunak - Sudhir mungantiwar
Rishi Sunak - Sudhir mungantiwarMumbai Tak

मुंबई : ब्रिटनच्या ताब्यात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची हिरेजडीत जगदंबा तलवार भारतात परत आणण्याच्या हलचालींना वेग आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना विनंती करणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते आज मुंबईत बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच महाराजांच्या विजयादशमीच्या पूजेसाठी वापरली जाणाऱ्या हिरे आणि रत्नजडीत जगदंबा तलवारीसाठी केंद्र सरकारला आम्ही विनंती केली. महाराजांची ही तलवार इंग्रज मोहापोटी घेऊन गेले होते. पण त्या तलवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झाला आहे. आमच्यासाठी ती जगातील साऱ्या संपत्तीपेक्षा अमुल्य आहेत. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत आहोत.

केंद्र सरकारला सांस्कृतिक विभागाच्या वतीने पत्रव्यवहार सुरु केला आहे. सोबतच ऋषी सुनक यांच्याशी याबाबत चर्चा करुन ही तलवार परत यावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

शिवराज्याभिषेकाला जून 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण :

जून 2024 मध्ये शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मोठा आराखडा करत आहोत. या सर्व कार्यक्रमात जर जगदंबा तलवार आम्हाला ब्रिटनने दिली तर तो आमचा आनंदोत्सव हा निश्चितपणे उत्तम पद्धतीने करण्यात मदत होणार आहे. त्यामुळेच आम्ही जगदंब तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in