
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार हा प्रश्न आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नागपूरमध्ये ते शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे विमानतळावर येताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना बंडाबाबत विचारलं असता, आता बंड विसरून जा. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच बंड केलेल्या आमदारांना आम्ही विचारत नाही असंच त्यांनी एक प्रकारे दाखवून दिलं आहे. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे... कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो.. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे... कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व जागच्या जागी आहे... महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणजे भास आहे, हे सर्व तात्पुरता आहे.. शिवसेना अशा परिस्थितीतून अनेक वेळेला बाहेर पडली आहे... गेले 56 वर्ष अनेक संकट, अनेक वादळ आम्ही पाहिले आहे.. शिवसेना विदर्भात काम करत आहे हळूहळू चित्र स्पष्ट होईल... पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी पाठवले आहे.. सर्व कार्यकर्ते जागच्या जागी आहे... त्यामुळे चिंता नसावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नवीन सरकारचा मागच्या सरकारचे निर्णय बदलत आहे... विरोधासाठी विरोध केला जातो आहे.. फक्त दोघांचं कॅबिनेट काम करत आहे.. दिवस बदलतात... महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात आलेला नाही... फक्त दोघेच कॅबिनेटमध्ये आहे... अजून सरकार का अस्तित्वात आलं नाही.. मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही हा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर हे सरकार बेकायदेशीर आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना त्यांच्या बद्दल निर्णय झालेला नसताना... मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे.. त्यांच्या बद्दल अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे... त्यामुळे राज्यपालाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे बेकायदेशीर आहे... त्यामुळे 19 तारखेला मंत्र्यांना शपथ देणे हे ही बेकादेशीर राहील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यपाल कुठे आहेत आता त्यांच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्राला गरज आहे असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.