Advertisement

सामना : पुन्हा कमळाबाई, शहांच्या दौऱ्याचाही समाचार; भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

भाजपला पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून डिवचले आहे.
Amit Shah - Uddhav Thackeray
Amit Shah - Uddhav Thackeray Mumbai Tak

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (4 सप्टेंबर) पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने गणेशोत्सवानिमित्त असल्याचे सांगितले जात असले तरीही राजकीय दृष्ट्याही हा दौरा अनेकार्थांनी महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात नुकतेच आलेले शिंदे-फडणवीस सरकार, मुंबई आणि इतर महापालिका निवडणुका अशा पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

शिवसेनेकडून मात्र शहा यांच्या दौऱ्यावर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सोमवार (5 सप्टेंबर) च्या सामना अग्रलेखामध्ये उद्धव ठाकरेंकडून यावर भाष्य करण्यात आले आहे. तसेच भाजपला पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून डिवचले आहे. त्यावर भाजप नेत्यांकडूनही संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

Amit Shah - Uddhav Thackeray
अमित शहा मुंबईमध्ये : देवदर्शन, भेटीगाठींसह राजकीय समीकरणांचा भरगच्च कार्यक्रम

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका

आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे.

दसरा मेळावा होवू नये यासाठी भाजपचा अट्टाहास :

आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे ‘कमळाबाई’ मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे.

दसरा मेळावा शिवसेनेचा यावर जनतेचे नाही तर देवदेवता, संत सज्जनांचेच शिक्कामोर्तब अनेकदा झाले आहे. दसरा मेळाव्यातून फुंकलेल्या रणशिंगातून कमळाबाईच्या वैभवात भर पडलेली आहे. याच दसरा मेळाव्यात अनेकदा भाजपचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेतेही अवतीर्ण झाले आहेत. दसरा मेळावा हा राजकीय जागर असतो.

Amit Shah - Uddhav Thackeray
राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, 'सुरती' बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मऱ्हाठ-हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर.

दसरा मेळावा होणारच!

दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱ्यांच्या ५६ पिढ्या खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही", सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाड्याची गर्दी जमवून स्वत:चा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. अतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार? भारतीय जनता पक्षाला शिवतीर्थावरच मराठी लोकांत दोन तट पडून तेथेट मराठी रक्त सांडावे असे वाटते.

ज्या शिवतीर्थावरुन संयुक्त महाराष्ट्राच्या विराट सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, ज्या शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची आणि विजयाची ललकारी घुमली, ज्या शिवतीर्थावर मर्हाठी एकजुटीच्या लाखो वज्रमुठी आवळल्या त्या वज्रमुठी तुटाव्यात हेच भाजपचे मिशन मुंबई आहे. एका बाजूला शिंदे गटास छू छू करुन सोडायचं दुसऱ्या बाजूला आणखी एखाद्या मर्ठाठीधर्मी संघटनेस मतफुटीसाठी वापरायचे व एकदाचा शिवसेनेचा पराभव घडवून मुंबईचा घास गिळायचा हे त्यांचे मिशन असेल तरी अशा महाराष्ट्रद्रोही मिशनवाल्यांशी सामना करण्याचे सामर्थ शिवसेनेच्या मनगटात आहे.

भाजप नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया :

दरम्यान या अग्रलेखावर भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुळात उध्दव ठाकरें सोबत राहिला आहे तो जमिनीशी संबंध नसलेला पेंग्विन गट. शिवसेना, शिवसैनिक एकनाथ शिंदे सोबत कधीच आलेत. वास्तवाची माहिती नसलेले संपादक उध्दव ठाकरे असे अग्रलेख लिहीत असावेत. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही घरी बसून पक्ष गमावला, अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवय काही केले नाही, आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायत, असे म्हणतं निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in