उद्धव ठाकरे : 'देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असं का वागलं, हे मलाही समजलं नाही'

Uddhav thackeray Interview : उद्धव ठाकरेंनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत सरकार आणि फडणवीसांबद्दल काय म्हटलंय?
uddhav thackeray interview with sanjay raut
uddhav thackeray interview with sanjay raut

उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतील, असाच सूर होता. मात्र, शपथविधीला काही मिनिटांचा वेळ असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेवर उद्धव ठाकरेंनी आता भाष्य केलंय. शरद पवारांबाबतही त्यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार दगा देतील असं सांगितलं जात होतं मात्र मला माझ्याच लोकांनी दगा दिला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी शिंदे सरकारबद्दल उद्धव ठाकरेंना काय केला सवाल?

संजय राऊत - तुम्ही अडीच वर्षे राज्याचा कारभार केलात. सरकार चालवलंय. आजच्या नवीन सरकारकडे तुम्ही कसे पाहता?

उद्धव ठाकरे - सरकार स्थापन झाल्यावर याच्यावरती ‘बोलण्यात’ अर्थ आहे.

संजय राऊत - अजून सरकार स्थापन झाले नाही?

उद्धव ठाकरे - नाहीच! कारण सध्या ‘हम दो, एक कमरे मे बंद हो… और चाबी खो जाय’ असेच सर्व सुरू आहे. चाबी ‘वरनं’ जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

संजय राऊत - 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार आहे…

उद्धव ठाकरे - हो, आहेच ती. त्याच्याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. कारण ते प्रकरण आता कोर्टात आहे. मात्र अनेक घटनातज्ञांच्या मतानुसार कायद्याने काय होणार हे लोकांना आता कळलेलं आहे. कारण जो कायदा आहे त्यात सगळं काही स्वच्छ आणि स्पष्ट आहे… आणि मला नाही वाटत की, आपल्या देशात घटनाबाह्य कृत्य करण्याची हिंमत कोणात असेल. न्यायालयात जे काही होईल ते होणार आहे. पण त्याच्यामुळे आता मला जास्त बोलायचे नाही. मात्र एकच सांगतो, की पूर्वी देव आनंदचा एक पिक्चर होता ‘हम दोनो’! दोनोवरून बरंच काही आहे.

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रश्न, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

संजय राऊत - आज तुम्हाला महाराष्ट्रामधील गंमत नाही का वाटत, ‘हास्यजत्रे’चा सीझन म्हणून? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे ते उपमुख्यमंत्री झालेले दिसताहेत…

उद्धव ठाकरे - ही उपरवाले की मेहरबानी!

संजय राऊत - हा कोणता उपरवाला?

उद्धव ठाकरे - ज्याचं त्याला माहीत.

संजय राऊत - देवेंद्र फडणवीस भाजपचे इकडले सगळ्यात मोठे नेते. ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते…

उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही, पण ठीक आहे. तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला असा गैरसमज करू नाही द्यायचा की, त्यांना शिवसेनेसोबत यायचे आहे. मी उगाच असा पोकळ दावा करणारही नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत. बाहेरच्या माणसांना सर्व दिलं जातंय. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली. त्यावेळी वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बाहेरचा माणूस. आता मुख्यमंत्रीपदी… इतर पदांवरही बाहेरचे. तरीही ते निष्ठा म्हणून काम करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in