Narayan Rane: "उद्धव ठाकरेच गद्दार! एकनाथ शिंदेसारख्या कडवट शिवसैनिकांशी गद्दारी करून.."

जाणून घ्या नेमकं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काय म्हटलं आहे?
Uddhav Thackeray is a traitor Says Narayan Rane
Uddhav Thackeray is a traitor Says Narayan Rane

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकांशी गद्दारी करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केली आहे. भाजप नेते निलेश राणेंच्या वतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोदी एक्स्प्रेस ही विशेष ट्रेन सोडण्यात आली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दादर मध्ये उपस्थित होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं अस्तित्व उरलेलं नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात बोलण्यासारखं त्यांच्याकडे काय राहिलं आहे? शिवसेनेसोबत खरी गद्दारी केली ती उद्धव ठाकरेंनीच. गद्दारी करून मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी मिळवलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जी कामं त्यांनी केली ती फक्त मातोश्री आणि आपल्या नातेवाईकांसाठी तसंच निकटवर्तीयांसाठी केली अशीही टीका नारायण राणेंनी केली आहे.

आवाज कुणाचा याचं उत्तर मिळालं आहे

आवाज कुणाचा याचं उत्तर आता सगळ्यांना मिळालं आहे. उद्धव ठाकरेंकडे आमदारच राहिलेले नाहीत. जे काही उरलेसुरले आमदार आहेत ते पण एकनाथ शिंदेंसोबत लवकरच येतील असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. तसंच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन तिथे बोलण्यासारखं आता उद्धव ठाकरेंकडे शिल्लक काय राहिलं आहे? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे.

गणरायाच्या आशीर्वादाने राज्यात सत्तांतर झालं

गणरायाच्या आशीर्वादाने राज्यात सत्तांतर झालं असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. अडीच वर्षांच्या उद्धव ठाकरेंच्या काळात आपला महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत दहा वर्षे मागे गेला आहे. आता गणरायाच्या कृपेने मागचं सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राज्याचा आता सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला.

२१ जूनला शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना आव्हान देत शिवसेनेत बंड पुकारलं. त्यामुळे त्यावेळी अस्तित्त्वात असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो आहे. या टीकेला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं असून उद्धव ठाकरेच खरे गद्दार आहेत असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in