Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘महाराष्ट्र म्हणजे गंमत नाही’; ठाकरेंचा शरद पवारांना इशारा
शरद पवार यांनी अजित पवारांची घेतली भेट : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवारांना पहिल्यांदाच इशारा दिलाय. शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर पहिल्यांदाच भाष्य करण्यात आलंय.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Ajit Pawar meet : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडीयांच्या घरी बैठक झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षही नाराज झाले आहेत. ही नाराजी बाहेर आली असून, उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना अग्रलेखातून शरद पवारांना इशारा देण्यात आलाय. गुप्त भेटीवर स्फोटक भाष्य करण्यात आलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्मावरही बोट ठेवलं आहे. (Uddhav Thackeray gets Disappointed on Sharad Pawar Ajit Pawar Meeting)
पवार काका पुतण्या भेटीबद्दल सामना अग्रलेखात म्हटलंय की, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे.”
वाचा >> Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱ्याचदा गंमत असते. ‘अजित पवार हे ‘मविआ’त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील’, असे नाना म्हणाले. त्याआधी नाना यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे.’ नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही.”
‘एकनाथ शिंदेंची झोप उडाली की…’
ठाकरेंनी अग्रलेखात म्हटलंय की, “अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळय़ात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही.”