Tukaram Mundhe : 17 वर्षात 19 बदल्या! मुंडे असं काय करतात की त्यांची बदलीच केली जाते?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

17 वर्षांच्या सेवेत तब्बल 19 वेळा बदली झालेले आयएएस अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे! सरकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं पत्रक निघालं की त्यात तुकाराम मुंढेचं नाव असतंच. आता परत त्यांची बदली झाली. तुकाराम मुंडेची ही त्यांची 19 वी बदली आहे. त्यांच्या बदलीच्या वेळी लोक रस्त्यावरही उतरले… मग, नागपूर असू देत किंवा नाशिक…लोकांनी त्यांच्या बदलीला विरोध केला. लोक बदली करू नका असं म्हणत असतानाही तुकाराम मुंढेंची वारंवार बदली का होते? कारकिर्दीला 17 वर्ष आणि बदल्या मात्र 19 वेळा…असं का घडतं? बदलीची नेमकी कारणं काय?

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तुकाराम मुंढे यांना कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी दिली. त्यांनी त्यांच्या धडाकेबाज शैलीत काम सुरू केलं. बीड, अकोला, परभणी, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांत त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावणं, आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी तंबी देणं, असा कामाचा सपाटा सुरू केला. हे सुरू असतानाच शासनाचे आदेश आले आणि तुकाराम मुंढेंना दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यास सांगितलं.

तुकाराम मुंडेंची सातत्यानं बदली का केली जाते…?

मुळात तुकाराम मुंढे यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. तुकाराम मुंढेंची सुरुवात झाली, ती २००५ ला सोलापूर उपजिल्हाधिकारी पदापासून….त्यानंतर त्यांनी नागपूर, नवी मुंबई आणि नाशिक यांसारख्या मोठा महापालिकांचं आयुक्तपदही सांभाळलं…ज्या ठिकाणी त्यांच्या बदल्या होतील त्या ठिकाणी ते त्यांच्या कामाची छाप सोडतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नगरसेवकांशी आणि महापौरांशी भांडणं, नगरसेवकांना वाईट वागणूक, सत्ताधाऱ्यांशी कायम वाद, शिस्तीचे भोक्ते असल्यामुळे जिथे जातील तिथे आधी वेळेवर उपस्थितीची सक्ती करणे, दणादण निलंबनाची कारवाई करणे यामुळे कायम ते चर्चेत असतात. तुकाराम मुंढेंच्या बदल्या झाल्या, त्यावेळी लोकांनी विरोध केला.

नागपूर-नाशिकमध्ये लोक रस्त्यावर उतरली होती. असं असलं तरी सत्ताधारी, राजकारणी आणि तुकाराम मुंढे यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसंत. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं, तर नागपूर महापालिकेत, मुंढेंचा महापौरांसोबत वाद झाला होता. मुंढेंविरोधात, सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. इतकंच नाहीतर नितीन गडकरींनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर शेवटी मुंढेंची बदली झाली. पण, असं वारंवार का होतं?

तुकाराम मुंडेंची कार्यशैली बदल्यांसाठी जबाबदार आहेत का?

तुकाराम मुंडेंच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या बदल्या होतात, असं बोललं जातं. याबद्दल, नागपुरातील ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित सांगतात, ‘लोकशाही संरचनेमध्ये प्रशासकीय अधिकारी चौकटीत राहून शासनाचं काम करणं अपेक्षित आहे. भूमिका घेणं हे मुंढेंचं वैशिष्ट्य आहे. हे त्यांच्यासाठी शाप ठरतेय. मुंढेंनी काही संकेत पाळले ते बदल्यांचं दुष्टचक्र थांबू शकतात. त्यासाठी तुकाराम मुंढेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असा सल्लाही अपराजित देतात.

ADVERTISEMENT

तुकाराम मुंढेंनी PMPML चे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केलं. यावेळची आठवण सांगताना, वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, ‘तुकाराम मुंढेंच्या कामाची शैली वेगळी आहे. त्यांना जसं हवं तसं काम ते करतात. ते कधीही झुकत नाही. PMPML मध्ये असतानाही खासगी ठेकेदारांना फायदा झाला, आणि प्रशासनाला नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यांनी धडाकेबाज शैलीत काम केलं. परिणामी, ठेकेदार-लोकप्रतिनिधी यांचे हितसंबंध दुखावले गेले. त्यांच्या रोखठोक, धारदार शैलीमुळे लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांची वारंवार बदली होत असावी.’

तुकाराम मुंडेंना कोणत्याही पदावर जास्त काळ का ठेवलं जात नाही?

‘नागपूर महापालिकेतही त्यांनी प्रशासनाला शिस्त लावली होती. तिथंही कंत्राटदारांचे हितचिंतक दुखावले होते, त्यामुळे त्यांची बदली झाली आणि त्यांच्या या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्या बदल्या होतात’, असं नागपूर महापालिकेचं रिपोर्टींग करणारे पत्रकार राजेश प्रायकर सांगतात.

ADVERTISEMENT

तुकाराम मुंढे कायम चर्चेत असतात, प्रसारमाध्यमांमध्ये झळकत असतात…ते सतत प्रसारमाध्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांच्यावर होतो. याबद्दल, अपराजित सांगतात, ‘अधिकारी दोन प्रकारचे असतात. एक कर्तव्यदक्ष म्हणजे सजग असणे आणि दुसरा कर्तव्यलक्ष म्हणजे आपल्या कामाकडे इतराचं लक्ष असणे.’

‘तुकाराम मुंढे हे दुसऱ्या प्रकारातले अधिकारी वाटतात. ते प्रामाणिकपणे काम करत असतील. पण, आपण जे काम करतो त्याकडे लोकप्रतिनिधींपासून जनसामान्यांपासून सर्वांचं लक्ष असावं, असं त्यांना वाटतं. त्यातून त्यांची लक्षवेधी कर्तबगारी प्रशासनाच्या आड येत असावी. त्यामुळे त्यांच्या बदल्या होतात’, असं अपराजित यांनी तुकाराम मुंडे यांच्या सततच्या बदल्यांवर मांडलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT