
आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपलेला असताना बीसीसीआयने अखेरच्या चार सामन्यांसाठी ठिकाणांची घोषणा केली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर अखेरचे चार सामने रंगणार आहेत. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.
पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये तर दुसरा क्वालिफायर आणि फायनल सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. असं असेल शेवटच्या चार सामन्यांसाठीचं शेड्यूल...
24 मे 2022 - क्वालिफायर 1 - कोलकाता
25 मे 2022 - एलिमिनेटर - कोलकाता
27 मे 2022 - क्वालिफायर 2 - अहमदाबाद
29 मे 2022 - अंतिम सामना - अहमदाबाद
यावेळी जय शहा यांनी महिला क्रिकेटपटूंसाठी टी-20 चॅलेंजर स्पर्धा खेळवली जाणार असल्याचं जाहीर केलं. 23 ते 26 मे या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात खेळवली जाणार आहे. 28 मे ला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. सुरुवातीला हे सामने लखनऊमध्ये खेळवले जाणार होते परंतू यानंतर या स्पर्धेचं ठिकाण बदलण्यात आलं.
कोरोनामुळे यंदाचे आयपीएल सामने बीसीसीआयने मुंबई आणि पुण्यात आयोजित केले होते. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉन, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील तर पुण्यातील गहुंजे स्टेडीअमवर साखळी सामने खेळवले जात आहेत. शेवटच्या चार सामन्यांसाठी बीसीसीआय प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत काही शिथीलता देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.