
भारतीय संघ (Team India) येत्या सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. नुकताच आयपीएलचा (IPL 2022) हंगाम संपवून भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेसोबत दोन हात करणार आहेत.
पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक नवोदितांना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही पाच सामन्यांची मालिका आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) महत्त्वाची मानली जाते.
विराट, रोहित नसताना फलंदाजीचं गणित
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भारतीय फलंदाजीची ढाल समजले जातात, आता त्यांनीच या मालिकेमधून माघार घेतल्याने भारतीय फलंदाजीची मदार इशान किशन, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत. श्रेयश अय्यर यांच्या खांद्यावरती आली आहे.
केएल राहुल, दिनेश कार्तिक यांनी आपल्या फलंदाजीचा जलवा आयपीएलमध्ये दाखवला आहे. आयपीएलमध्ये त्याने 600 च्या वरती धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजी जरी भक्कम वाटत असली तरी केएल राहुल सोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तसाच प्रश्न मधल्या फळीमध्ये कोणाल संधी द्यायची हा मोठा प्रश्न असणार आहे.
भारतीय संघात गोलंदाजांची मांदियाळी
आयपीएल 2022 मध्ये अनेक गोलंदाजांनी प्रभावित केले आहे. भारताचे प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय गोलंदाजीची मदार भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांच्या खांद्यावर आहे. संघाकडे रवी बिश्नोई, अक्सर पटेल यांच्यासारखे फिरकी गोलंदाज देखील आहेत. आगामी विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जाते.
भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्सर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका भारताच्या रेकॉर्डला ब्रेक लावणार?
भारताने सलग 12 सामने टी-20 सामने जिंकत नवा रेकॉर्ड केला होता. त्याच बळावर भारतीय संघ टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला होता. आता 13 सामना जिंकून भारतीय संघ नवा विक्रम करणार का की, आफ्रिका भारताला रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आफ्रिका संघातही दिग्गजांचा भरणा आहे. क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांनी आपल्या फलंदाजीचा जलवा आयपीएलमध्ये दाखवला आहे. दोघांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिेले आहेत.
अॅनरिक नॉर्टजे, कगिसो रबाडा, मार्को जॉन्सन सारखे घातक गोलंदाज देखील आफ्रिकेकडे आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिसन ड्युसेन स्टब्स, मार्को जॅन्सन.