पदकांचा दुष्काळ संपला ! Tokyo Olympics मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक इतिहासात गोलपोस्टवर झालेली कोंडी फोडण्यात भारतीय हॉकी संघाला यश आलं आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदाच्या सामन्यात जर्मनीवर ५-४ अशी मात करत पदकावर आपलं नाव कोरलं आहे. तब्बल ४१ वर्षांच्या फरकाने भारताने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक जिंकलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आली नाही. परंतू टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा संपवत भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरत, भारतीय हॉकीचे जुने दिवस पुन्हा एकदा आणले आहेत.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जर्मनीचं संपूर्णपणे वर्चस्व पहायला मिळालं. टिमूर ओरुझने दुसऱ्या मिनीटाला गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. संपूर्ण पहिल्या सत्रात जर्मनीने वारंवार भारतीय गोलपोस्टवर हल्ले करत भारतीय खेळाडूंना दडपणाखाली आणलं. ज्याचं उत्तर भारतीय खेळाडूंकडे दिसलं नाही. सुदैवाने पहिल्या सत्रात भारतीय संघाने एकपेक्षा जास्त गोल खाल्ला नाही.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारतीयांनी आक्रमणाची धार वाढवली. सिमरनजीत सिंगने १७ व्या मिनीटाला जर्मनीच्या पेनल्टी एरियात प्रवेश करत गोलकिपर अलेक्झांडर स्टाडलरला चकवत भारताचा पहिला गोल केला. जर्मनीशी बरोबरी केल्यानंतर भारताला या सत्रात आपलं वर्चस्व गाजवण्याची संधी होती. परंतू मधल्या काळात भारतीय बचावफळीने अत्यंत गलथान खेळ केला. ज्याचा फायदा घेत जर्मनीकडून निकलास वॉलनने २४ व्या मिनीटाला तर २५ व्या मिनीटाला बेनेडिक्ट फर्कने गोल करत जर्मनीची आघाडी ३-१ ने वाढवली. काही क्षणांसाठी भारतीय संघाचं मनोबल कमी झालेलं पहायला मिळालं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परंतू हार न मानता भारताने जोरदार प्रत्युत्तर देत जर्मनीचा बचाव भेदक डी एरियात प्रवेश करत दोन पेनल्टी कॉर्नर कमावले. पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर २७ व्या मिनीटाला हार्दिक सिंगने डिफ्लेक्शनवर तर २९ व्या मिनीटाला युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला ३-३ अशी बरोबरी साधून देत सामना पुन्हा बरोबरीत आणला. काही क्षणांपूर्वी १-३ अशा पिछाडीवर पडलेल्या भारताने मध्यांतराला पुन्हा एकदा बरोबरी साधली.

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंना पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. मनदीप सिंगला गोलपोस्टजवळ जर्मन खेळाडूने धक्का दिल्यामुळे हा स्ट्रोक बहाल करण्यात आला. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने कोणतीही चूक न करता ३१ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी ४-३ ने वाढवली. गोलकिपरर अलेक्झांडर स्टाडलरने रुपिंदरपालच्या फटक्याचा अंदाज लावला होता. परंतू रुपिंदरपालला रोखण्यात तो अपयशी ठरला. यानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आक्रमणाची धार वाढवत जर्मनीच्या पेनल्टी एरियात प्रवेश केला. सिमरनजीत सिंगने ३४ व्या मिनीटाला डिफ्लेक्शनवर गोल करत भारताची आघाडी ५-३ ने वाढवली. तिसरं सत्र संपायला दोन-अडीच मिनीटांचा कालावधी बाकी असताना जर्मनीला पेनल्टी कॉर्नरवर ४ संधी मिळाल्या. परंतू या संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात जर्मनी अपयशी ठरला. सामना संपायला अवघे काही मिनीटं शिल्लक असताना जर्मनीने भारताचा बचाव पुन्हा एकदा भेदला पण गोल करण्यात त्यांना अपयश आलं. तिसऱ्या सत्राअखेरीसही भारताने आपली ५-३ ही आघाडी कायम राखली.

ADVERTISEMENT

चौथ्या सत्रात जर्मनीने आक्रमक खेळाला सुरुवात करत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारताचा बचाव भेदून जर्मनीने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी निर्माण केली. यावेळी ल्युकास विंडफेडरने श्रीजेशचा बचाव भेदत जर्मनीची पिछाडी एका गोलने कमी केली. चौथ्या सत्रात भारताच्या खेळाडूंनाही गोल करण्याच्या संधी आल्या, परंतू बॉलवर ताबा ठेवण्याच अपयश आल्यामुळे त्यांनी या संधी गमावल्या. सामना संपायला शेवटची सात मिनीटं बाकी असताना भारतीय संघ बचावात्मक पवित्र्यात गेला. यावेळी फायदा उचलत जर्मनीने बचाव भेदत पेनल्टी एरियात प्रवेश केला, परंतू श्रीजेशने यावेळी जर्मनीला बरोबरीची संधी दिली नाही. सामना संपायला ४ मिनीटं बाकी असताना जर्मनीने आपल्या गोलकिपरला हटवत आक्रमणात आणखी एका खेळाडूची वाढ केली. ज्याचा फायदा घेत जर्मन खेळाडूंनी भारताचा बचाव भेदत सामना संपायला अडीच मिनीटं शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नर मिळवला. परंतू भारतीय बचावफळीने हे आक्रमण पुन्हा एकदा परतवून लावलं. अखेरच्या काही सेकंदात जर्मनीने बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत पुन्हा एकदा शॉर्ट पासच्या सहाय्याने पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. परंतू भारतीय बचावफळीने जर्मनीची ही संधी हिरावून घेत सामन्यात बाजी मारत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT