Dahi Handi 2025: यावर्षी 16 ऑगस्ट रोजी 'दहीहंडी'चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी हजारो गोविंद पथके या सणाची अगदी आतूरतेने वाट पाहत असतात. विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडण्यासाठी स्पर्धा घेण्यात येतात. मोठमोठी बक्षीसे पटकावण्यासाठी उत्सवाच्या बऱ्याच दिवसांआधी पथकांची तयारी आणि सराव सुरु असतो. मात्र, हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईत मोठी दुर्घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. दहीहंडीच्या सरावादरम्यान एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सरावात अल्पवयीन गोविंदाचा मृत्यू
रविवारी (10 ऑगस्ट) दहिसर केतकीपाडा येथे ही दुर्दैवी घटना झाल्याची माहिती आहे. घटनेतील मृत तरुणाचं नाव महेश रमेश जाधव असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश जाधव त्याच्या पथकासह दहीहंडीच्या उत्सावासाठी सरावात सहभागी झाला होता. मात्र, यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत त्याला त्याचा जीव गमवावा लागला. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली असून अल्पवयीन गोविंदांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा: 'माझे घर धोक्यात... ते वाचवा', अभिनेता किशोर कदमांची 'ती' Facebook पोस्ट प्रचंड Viral
6 व्या थरावरुन कोसळला अन्...
दुर्घटनेत मृत पावलेला महेश हा नवतरुण मित्र मंडळ पथकाचा सदस्य होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे पथक सराव करत होतं. सरावादरम्यान, पथकातील गोविंदांनी 6 थर लावले. त्यावेळी पीडित महेश सहाव्या थरावर चढला होता. मात्र, सरावात तोल गेला असता महेश सहाव्या थरावरुन खाली कोसळला आणि इतर गोविंदांनी त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. यानंतर, महेशला तातडीने दहिसरच्या प्रगती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान महेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: प्रेमसंबंधात कोणाला यश तर कोणाचा ब्रेकअप? काही राशीतील लोकांच्या नातेसंबंधाविषयीचे आठवडाभराचे राशीभविष्य
दुर्घटनांमध्ये वाढ
संबंधित प्रकरणी पोलिसांनी एडीआर नोंदवला असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. या गंभीर दुर्घटनेतून अनेक लहान पथके कोणत्याही ठोस सुरक्षा उपायांशिवाय सराव करत असल्याचं निर्दशनास येत आहे. सरावादरम्यान, हेलमेट, सेफ्टी बेल्ट तसेच गादीचा उपयोग न केल्याने अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. यावर बंदी घालण्याची गरज असल्याचं समोर येत आहे.
ADVERTISEMENT
