Crime News : बेंगळुरूमधील बागलूरूमध्ये एका अपघातामुळे अपहरण आणि हत्येचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लंडनहून शिक्षण घेऊन परतलेल्या एका तरुणाने कर्जाच्या परतफेडीसाठी भयानक पाऊल उचलले. अतिशय नाट्यमयरीत्या हे प्रकरण समोर आले आहे. बुधवारी (16 सप्टेंबर) रात्री बल्लारी रोडजवळील सर्व्हिस रोडवर एका भरधाव कारने काही वाहनांना आणि भिंतीला धडक दिली. स्थानिकांनी कार थांबवून 28 वर्षीय चालक भास्कर रेड्डी याला निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा जाब विचारला. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि भास्करच्या विसंगत व अडखळत्या उत्तरांमुळे त्यांना संशय आला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये 13 वर्षीय प्रज्वल नावाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे सर्वजण हादरून गेले.
ADVERTISEMENT
पळून जात असताना घडलं भयानक
पोलिसांच्या चौकशीत भास्करने आपला शेजारी असलेल्या प्रज्वलची हत्या केल्याची कबुली दिली. प्रज्वलला कार चालवण्याची आवड होती, याच गोष्टीचे आमिष दाखवून 16 सप्टेंबरच्या रात्री भास्करने त्याला आपल्या कारमध्ये बसवले आणि एका निर्जन स्थळी नेले. यावेळी कारमध्ये भास्करचा एक मित्रही होता, ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तिथे पोहोचल्यावर प्रज्वलने विरोध करत पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भास्करने त्याच्या डोक्यावर आधी काठीने आणि नंतर सिमेंटच्या ब्लॉकने जोरदार हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रज्वलचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : चॅटजीपीटी वापरताना सापडला, आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; संतप्त विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने
एज्युकेशन लोन फेडण्यासाठी...
शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने भास्करने हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. भास्कर काही महिन्यांपूर्वीच लंडनहून मास्टर पदवी पूर्ण करून परतला होता आणि व्हाईटफिल्ड येथील एका खाजगी कंपनीच्या फायनान्स विभागात काम करत होता. प्रज्वलच्या हत्येनंतर तो घाबरला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हैदराबाद हायवेच्या दिशेने पळ काढत असतानाच त्याच्या कारचा आधी एका खांबाला आणि नंतर दोन गाड्यांना धडकून अपघात झाला. तत्पूर्वी, आरोपींनी प्रज्वलचा एक व्हिडिओही बनवला होता, ज्यामध्ये तो अपहरणकर्ते मारून टाकतील म्हणून स्वतःच्या वडिलांकडे खंडणी देण्याची याचना करत होता. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी कुटुंबाला पाठवण्याचा त्यांचा कट होता.
हे ही वाचा : Sanjay Raut Interview : तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?
'असा' होता प्लॅन
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे. प्रज्वलला जिवंत सोडल्यास तो आपल्याला सहज ओळखेल, अशी भीती भास्करला होती. त्यामुळे आधी अपहरण करायचे, खंडणीसाठी व्हिडिओ बनवायचा, हत्या करायची आणि नंतर कुटुंबाकडे पैशांची मागणी करायची, असा त्याचा भयानक कट होता. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि हत्येशी संबंधित भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमांनुसार एफआयआर दाखल केला असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या दुसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT












