बापाने 5 स्टार हॉटेलमध्ये 2 मुलींना संपवलं, पत्नीबद्दल होता 'तो' संशय अन्..

मुंबई तक

• 09:06 PM • 12 Aug 2026

बंगळुरूच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दोन मुलींच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. वडिलांच्या कथित सुसाइड नोटमध्ये पत्नीशी वाद आणि मुलींच्या कस्टडीचा उल्लेख करमण्यात आला आहे.

bengaluru hotel father imran murder two daughters suicide note custody dispute

Crime News (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये दोन चिमुकल्या मुलींच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इमरान नावाच्या व्यक्तीने आपल्या 5 आणि 10 वर्षांच्या मुलींची हॉटेलच्या खोलीत कथितरित्या गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःचेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सध्या इमरान रुग्णालयात उपचार घेत असून, प्रकृती सुधारल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे.

हे वाचलं का?

मुलींची हत्या, वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

ही घटना बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका आलिशान हॉटेलमध्ये घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत इमरानच्या दोन्ही मुली गंभीर अवस्थेत आढळल्या. त्यांची ओळख 5 वर्षीय शेख झेहरा आणि 10 वर्षीय शेख झोया अशी करण्यात आली आहे.

इमरान हा एका खासगी कॅब कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. घटना समोर आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलीच्या स्कूल नोटबुकमध्ये सुसाइड नोट

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना इमरानच्या लहान मुलीच्या स्कूल नोटबुकमध्ये दोन पानांची कथित सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

हे ही वाचा>> बारामती : लग्नाआधी शारिरीक संबंध, ती एक गोळी आणि तरुणीचा मृत्यू

तसेच, आपल्या मुलींची कस्टडी पत्नीला देण्याची आपली तयारी नव्हती, असेही त्याने या नोटमध्ये लिहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पत्नीशी असलेले वैवाहिक मतभेद आणि मुलींच्या कस्टडीचा वाद या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत.

सुसाइड नोटच्या शेजारी चिमुकलीचे हेलिकॉप्टरचे चित्र

या प्रकरणातील आणखी एक भावनिक बाब तपासादरम्यान समोर आली. ज्या पानावर कथित सुसाइड नोट लिहिण्यात आली होती, त्याच्या शेजारी मुलीने काढलेले हेलिकॉप्टरचे चित्र होते. हे चित्र झेहराने काही दिवसांपूर्वी काढले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

एका बाजूला चिमुकलीचे निरागस चित्र आणि दुसऱ्या बाजूला वडिलांनी लिहिलेली कथित सुसाइड नोट असल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

पत्नीवर संशय, नात्यात वाढला होता तणाव

कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, इमरानचा स्वभाव काही काळापासून संशयी आणि नियंत्रण ठेवणारा असल्याचे सांगितले जात आहे. तो पत्नीच्या विविध हालचालींबाबत प्रश्न उपस्थित करत असे. शेजारील दुकानदार आणि सुरक्षा रक्षकांशी पत्नी बोलत असल्याबद्दलही तो संशय व्यक्त करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा>> 'आज तुझा विषयच मिटवतो..', बँक कर्मचाऱ्याने शिक्षक पत्नीला संपवलं, लेकरांच्या डोळ्यासमोर हत्या

पत्नीने आपल्या कुटुंबीयांना इमरानच्या वागणुकीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर दोघांमधील वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही.

वेगळे होण्याची तयारी, मुलांच्या कस्टडीवरून वाद

पती-पत्नीमधील संबंध इतके बिघडले होते की, दोघे वेगळे होण्याच्या स्थितीत पोहोचले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

याच काळात दोन्ही मुलींच्या कस्टडीचा मुद्दा अधिक गंभीर झाला. मुलींची कस्टडी कोणाकडे राहणार, हा वाद या घटनेमागील संभाव्य कारण ठरला का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, कस्टडीचा वाद हेच अंतिम कारण असल्याचे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

घटनेच्या दिवशी पत्नीचा WhatsApp मेसेज

घटना घडलेल्या सोमवारी दुपारी इमरानच्या पत्नीने त्याला WhatsApp वर मेसेज केला होता. या मेसेजमध्ये ती मुलींची योग्य प्रकारे काळजी घेण्याच्या स्थितीत नसल्याचे तिने सांगितल्याचे समोर आले आहे.

तसेच, मुलींची कस्टडी आता तिच्याकडे राहू नये, असेही तिने म्हटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, या मेसेजवर इमरानची नेमकी प्रतिक्रिया काय होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हा WhatsApp संवादही तपासाचा भाग बनवला आहे.

इमरानचा जबाब ठरणार महत्त्वाचा

इमरान सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांनी अद्याप त्याचा सविस्तर जबाब नोंदवलेला नाही. प्रकृती सुधारल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.

पोलिस आता सुसाइड नोट, WhatsApp मेसेज, कुटुंबीयांचे जबाब आणि हॉटेलमध्ये घडलेल्या घटनांची माहिती एकत्रित करून तपास करत आहेत. मुलींच्या हत्येमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचा शोध घेण्यासाठी या सर्व पुराव्यांची पडताळणी केली जाणार आहे.