Crime News : तेलंगाणातील कामारेड्डी जिल्ह्यात 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. घरी एकट्या असलेल्या या महिलेवर अज्ञातांनी हल्ला करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटले आणि त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली. चिट्टिमिल्ला अनासुया असे मृत महिलेचे नाव असून त्या कामारेड्डी जिल्हा मुख्यालयातील कोठारी गल्ली भागात राहत होत्या. घरातील सोन्याची साखळी आणि इतर दागिने चोरण्याच्या उद्देशानेच चोरट्यांनी घरात घुसून हा धक्कादायक प्रकार घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
तीन तास गल्लीत फिरले अन्...
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या संशयाने स्थानिक नागरिकांची चिंता अधिक वाढवली आहे. आरोपी अचानक घरात शिरले नसून त्यांनी आधी परिसराची रेकी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. संशयितांनी सुमारे तीन तास गल्लीत फिरून परिसरावर लक्ष ठेवले होते. कोणती महिला कधी एकटी असते आणि घरात शिरण्यासाठी योग्य वेळ कोणती, याची पूर्ण माहिती गोळा करूनच हा गुन्हा घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, तपासाअंतीच या रेकीशी संबंधित माहितीला अधिकृत पुष्टी मिळणार आहे.
हे ही वाचा : 15 वर्ष ज्याला राखी बांधली, त्याच्याशीच केलं लग्न; वडिलांनी केले अंत्यसंस्कार!
सीसीटीव्हीमध्ये काय?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराची व परिसराची पाहणी केली आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वेगाने तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून, घटनेपूर्वी आणि घटनेनंतर परिसरात दिसणाऱ्या संशयित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा : मुंबईत लग्न, मग दुसरं अफेअर; लिव्ह इनमधून झालेल्या बाळासोबत काय केलं?
हत्येमागील सत्य काय?
आरोपी मृत महिलेला आधीपासून ओळखत होते की त्यांनी केवळ दागिन्यांसाठी या घराला लक्ष्य केले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यात किती जण सहभागी होते आणि ते कोणत्या मार्गाने आले व फरार झाले, याचाही सखोल तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, या हत्येमागील पूर्ण सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












