इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
उद्या बंडखोर रस्त्यावर दिसले तर विचारा की गद्दारी का केली? उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर का खुपसला? एवढंच विनम्रपणे विचारा. असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलं आहे. औरंगाबादमध्ये शिव संवाद यात्रा होती त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं-आदित्य ठाकरे
राजकारणात चांगल्या नसताना स्थान नसतं हे मी ऐकलं होतं. त्याचा प्रत्यय या गद्दारांमुळे आला. कारण त्या गद्दारीमुळेच या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खुर्चीवरून पायउतार व्हायला लावलं. उद्धव ठाकरे यांच्याबाबत कुणालाही विचारा सगळे जणं हेच सांगतील की चांगला माणूस आणि काम करणारा मुख्यमंत्री. त्यामुळे आता चांगल्या माणसाला राजकारणात स्थान निर्माण करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे ते आपण मिळवून देऊ यात माझ्या मनात शंका नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मागच्या दोन-अडीच वर्षात जे जे सर्वे झाले त्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आलं होतं. आम्ही जे लोक गेले त्यांच्या मनात काय होतं कळलं नाही. आम्ही सगळ्यांना आपलं समजत होतो मात्र त्यांनीच माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हे बेकायदेशीर सरकार पडणार मला माहित आहे-आदित्य ठाकरे
हे सरकार चालणार नाही पडणार आहे हे मी सांगतो आहे. आम्ही स्वतःचं इमान विकलेलं नाही. आमच्या समोर विधानभवनात गद्दार बसले होते. ते आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. या सगळ्यांचे मुखवटे फाटले आहे. उद्धव ठाकरेंबाबत, आदित्य ठाकरेंबाबत प्रेम आहे हे सांगत होते. आता त्यांची वक्तव्य पाहा ते आता खरं बोलत आहेत. लोकशाहीचं खरं शस्त्र मतदान आहे. गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये केलं आहे.
या सगळ्यांना आम्ही भरभरून दिलं होतं. तरीही आमचं चुकलं कुठे? हा विचार मी करत होतो. त्यावेळी मला हे जाणवलं की सगळं नीट चाललं होतं तरीही यांनी गद्दारी का केली? उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळी यांच्या हातात खंजीर होता. उठाव करायला हिंमत लागते, हे पळून गेलेले गद्दार होते आणि गद्दारच राहणार नाही.
आदित्य ठाकरे यांनी नेमकं आपल्या भाषणात काय म्हटलं आहे?
मी ज्या रस्त्यावरून येतो आहे तिथून मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकं माझ्या गाडीसमोर येत आहेत आणि सांगत आहेत की उद्धव ठाकरेंसोबत आहोत. मी आज भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि मला बोलावं गद्दारांवर बोलावं लागतं आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. नामांतराबाबत या सरकारने पोरकटपणा केला. संभाजी नगर, धाराशिव या नावांना स्थगिती दिली. नव्या सरकारचं दुःख हेच असेल की नामांतर करताना वाद झाला नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
गेलं अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी होती. त्या सरकारमध्ये महाराष्ट्र शांत राहिला. याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र एकजूट राहिला, दंगली झाल्या नाहीत. याला म्हणतात सरकार ते आपण करून दाखवलं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT











