CM फडणवीसांना सलग दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर लागलं बोलावं, मंत्रिपद धोक्यात?

‘शासन भिकारी आहे...’असं वादग्रस्त विधान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे कृषी मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान

माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान

मुंबई तक

22 Jul 2025 (अपडेटेड: 23 Jul 2025, 10:08 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणिकराव कोकाटे यांच्या ‘शासन भिकारी आहे’ विधानावरून वाद

point

‘शासन भिकारी आहे...’, सलग दुसऱ्या दिवशी कोकाटेंनी ओढावून घेतला वाद

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज (22 जुलै) पत्रकार परिषदेत केलेल्या “शासन भिकारी आहे, शेतकरी नाही” या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. हे विधान त्यांनी पीकविमा योजनेच्या संदर्भात केले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पण आता सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंच्या विधानाची दखल घेत त्यांना इशारा दिला आहे. 

हे वाचलं का?

सुरुवातीला विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काल (21 जुलै) मुख्यमंत्री फडणवीसांनी 'हे भूषणावह नाही...' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर आता सलग दुसऱ्यादिवशी कोकाटेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाराज झाले आहेत. पण यामुळे कोकाटेंच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

'शासन भिकारी आहे, शेतकरी भिकारी नाही..', माणिकराव कोकाटे काय बोलून गेले?

एकीकडे विधानसभेत रमी खेळतानाचा वाद ताजा असताना माणिकराव कोकाटे यांनी दुसरा वाद ओढावून घेतला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत पीकविमा योजनेवर बोलताना ते म्हणाले की, “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही.”

हे ही वाचा>> 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?

दरम्यान, त्यांच्या याच विधानावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः, “शासन भिकारी आहे” या शब्दप्रयोगाला असंवेदनशील आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारं विधान असं म्हटलं आहे.

'असं बोलणं अतिशय चुकीचं...',  CM फडणवीस कोकाटेंवर नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा कोकाटेंच्या आजच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की, 'ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. पण मला असं वाटतं की, त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला. त्याची पद्धतही बदलली. कारण आपल्या लक्षात आलं की, पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत. म्हणून त्याची पद्धत बदलली.'

'पण पद्धत बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला.. शेतकऱ्याला मदत करूच पण त्यासोबत 5 हजार कोटी दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू. त्याची यावर्षीपासून आपण सुरूवात केली आहे. 25 हजार कोटी रूपये हे 5 वर्षात शेतीतील गुंतवणूक आपण वाढवतो आहोत.'

हे ही वाचा>> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?

'यामुळे मला असं वाटतं की, अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही. मी आजही सांगतो देशातल्या कोणत्याही राज्याच्या.. ज्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले राज्य आहेत त्यामध्ये आजही सगळ्यात चांगली आणि तुलनेने विकसनशील अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.' 

'आपल्यासमोर आव्हानं आहेत. पण तरीही आपण आपल्या अर्थव्यवस्थेला चांगलं ठेवलं आहे. अनेक राज्यं ही कर्जामध्ये 25 टक्क्यांच्या वर गेले आहेत. ही महाराष्ट्राची अवस्था नाही. त्यामुळे आहे त्या संसाधनांचा उपयोग करून महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले. 

सुप्रिया सुळे यांची कोकाटेंवर टीका  

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या विधानावर सडेतोड टीका केली. त्या म्हणाल्या, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला आणि यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या संपन्न राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.” अशी टीका करत सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कोकाटे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, कोकाटे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या विधानाचा बचाव केला. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना भिकारी म्हटले नाही, तर शासनाची आर्थिक परिस्थिती आणि पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर भाष्य केले. तसेच, त्यांनी रमी खेळण्याच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, “मी रमी खेळलो नाही, मला रमी खेळताच येत नाही. तो फक्त एक पॉपअप होता, जो मी स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो.” त्यांनी आपली बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.

    follow whatsapp