एकनाथ शिंदे आणि भाजपात रंगतंय 'चेकमेट'चं राजकारण, समांतर ताकदीसाठी तगडे मोहरे गळाला

Maharashtra Politics : 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्यास त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती.

Maharashtra Politics

Maharashtra Politics

ऋत्विक भालेकर

09 Apr 2026 (अपडेटेड: 09 Apr 2026, 01:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे आणि भाजपात रंगतंय 'चेकमेट'चं राजकारण

point

समांतर ताकदीसाठी तगडे मोहरे गळाला

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्षाची धार तीव्र होताना दिसत आहे. आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्यास त्यांना प्रभावीपणे शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखली आहे. साताऱ्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शिंदेंनी 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांमध्ये तगडे राजकीय प्रतिस्पर्धी आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाची समांतर ताकद निर्माण करून भाजपसमोर मोठे आव्हान उभे करणे, हा या हालचालींमागचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुरु केलेली ही मोर्चेबांधणी राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी मानली जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बारामती पोटनिवडणूक : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंनी कोणते नेते गळाला लावलेत? 

पंढरपूर-मंगळवेढा: भाजप आमदार समाधान अवताडे यांच्याविरोधात शिंदेंनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना शिवसेनेत प्रवेश देण्याची तयारी करून मोठे आव्हान उभे केले आहे.

अक्कलकोट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आमदार आहेत. शिंदेंनी सिद्धराम म्हेत्रेंना पक्षात घेऊन या मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आहे. सिद्धराम म्हेत्रे (माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार) हे अक्कलकोटमधील काँग्रेसचे मोठे नेते होते. जून २०२५ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक पश्चिम: भाजपच्या सीमा हिरे आमदार असताना शिंदेंनी अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून या बालेकिल्ल्यात शिवसेनेची समांतर ताकद निर्माण केली.

पालघर/डहाणू: भाजप आणि बविआच्या प्रभावाखालील या क्षेत्रात शिंदेंनी अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन स्वतंत्र फळी उभी केली.

तर दुसरीकडे, भाजपनेही शिंदे गटाच्या आमदारांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक पक्षात घेतले आहेत, जसे की पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजप प्रवेश.

कन्नडमध्ये शिंदे गटाच्या संजना जाधव यांच्यासमोर भाजपने हर्षवर्धन जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांना जवळ करून दबावाचे राजकारण सुरू केले आहे.

पालघर/बोईसर: शिंदे गटाचे राजेंद्र गावित आणि विलास तारे यांच्या मतदारसंघात भाजपने संतोष जणाठे यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांना प्रवेश देऊन कोंडी केली.

जागावाटपात स्वतःचे पारडे जड ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत 'धनुष्यबाण' चिन्हावरच उमेदवार लढवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर : समुद्राचे पाणी होणार गोड, फक्त पर्यावरण मंत्रालयाची परवानगी बाकी; मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार?