बारामती पोटनिवडणूक : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, काय म्हणाले?
Baramati Vidhansabha By Election : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज (दि.9) शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेसला सल्ला दिलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Baramati Vidhansabha By Election : महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत सूनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं होतं. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार शरद पवारांनी काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिलाय. शरद पवार काय म्हणाले? जाणून घेऊयात...
शरद पवार म्हणाले, असं आहे की, "काँग्रेसने लढवायचं ठरवलंय. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही काय त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघातामुळे रिक्त झाली. अपघातामुळे झाल्यामुळे कतृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रापासून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. मात्र, हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आमचा सल्ला आहे."
रोहित पवारांचं सर्व उमेदवारांना आवाहन
रोहित पवार म्हणाले, "बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली."









