‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. (11 Dies of Heat Stroke after Maharashtra Bhushan Award Event)
रुग्णांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “नागपूरवरून आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. आम्ही थेट इथे आलो. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांची भेट घेतली. त्यांच्याशी आम्ही बोललो. मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ… कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन. ही घटना दुर्दैवी आहे.”
‘अमित शाहांना सायंकाळी गोव्यात कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम सकाळी ठेवण्यात आला आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलं? कोणत्या स्तरावरची चौकशी झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.”
रुग्णांच्या भेटीनंतर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं
अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, तो फार महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना द्यायचा निर्णय झाला, तिही समाधानाची बाब होती. पण, हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं? हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. एक काळा डाग त्याला बसला आहे. अजूनही किती लोक मृत्यूमुखी पडली आहेत, हे निश्चितपणे पुढे येत नाहीये.”