गौतमी पाटील आली, पण डान्स न करताच निघून गेली; शेवटी चाहत्यांना…
गौतमी पाटीलचा पुण्यातील शिरूरमध्ये नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी न दिल्याने गौतमीला तसेच परत जावं लागलं
ADVERTISEMENT

‘सबसे कातील गौतमी पाटील’, या टॅगलाईननं महाराष्ट्रातील तरुणाईला भुरळ घातलीये. गौतमीच्या डान्स शोची राज्यभरातून मोठी मागणी होतेय. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या रोज बातम्या होत आहेत. कार्यक्रमातील हुल्लडबाजीचीही खूप चर्चा होते. पण या सगळ्या चर्चेत आता एक नवी घटना समोर आलीये. कार्यक्रमस्थळी येऊनही गौतमी पाटील डान्स न करताच निघून गेली. कार्यक्रम घेणाऱ्यांना मोठा झटका बसलाय. नेमकं काय घडलंय हेच जाणून घ्या…
पुण्यातील शिरूर तालुक्यातील अन्नापूर इथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंती निमित्ताने गुरुवारी 6 एप्रिलला हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी गौतमीही आपला सगळा लवाजमा घेऊन कार्यक्रमस्थळी आली. पण आयोजकांना ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. त्याचं झाले असे की, आयोजकांनी गौतमीच्या कार्यक्रमासाठी शिरूर पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावली.
गौतमी पाटीलच्या ऐवजी हिंदवी पाटीलचा डान्स
कार्यक्रमस्थळी गौतमी येऊनही तिला नृत्य सादर करता आलं नाही. यावेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे आता म्हटले जात आहे.
हेही बघा >> गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिवेंद्रराजे भोसलेंची एन्ट्री, पब्लिकसमोरच राजे म्हणाले…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. एक दोन अपवाद वगळता गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम वादामुळे चर्चेत येतो. अनेक ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात हाणामाऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसही गौतमी पाटील कार्यक्रम असेल, तेव्हा सतर्कता बाळगताना दिसत आहे.