Mumbai Weather: मुंबईत धो-धो पाऊस पडणार, घरातून बाहेर पडण्याआधी हवामान खात्याचा अलर्ट तर पाहा!
Mumbai Weather Today: मुंबईत 19 ऑगस्ट 2025 रोजी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई: भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी (मुंबई शहर आणि उपनगरे) मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सतत पावसाच्या सरी बरसत आहे. हीच परिस्थिती आज देखील कायम राहू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि रेल्वे सेवांवर परिणाम होऊ शकतो.
हवामानाचा अंदाज
हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातसह मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज, 19 ऑगस्ट रोजी, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पर्जन्यमान: आजही सोमवार प्रमाणेच मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग: समुद्रात 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी 8:30 पासून ते 20 ऑगस्ट रात्री 8:30 पर्यंत 3.5 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाचे निर्णय
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी: मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि ठाणे महानगरपालिकेने (TMC) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 19 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय, खासगी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई महापालिकेने नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत 1916 (बीएमसी) आणि 100/112/103 (मुंबई पोलीस) या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
इतर जिल्ह्यांमधील परिस्थिती
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.