Pune: कोथरूडच्या गुन्हेगारीवर भाजपच्या दिग्गज नेते का धरतायेत मौन?
पुण्यातील कोथरूड भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, यावर सत्ताधारी भाजपचे नेते मात्र मौन धरून आहेत. जाणून घ्या याचविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

आदित्य भवार, पुणे: गुन्हेगारांना सोबत घेऊन काम करण्यास अनेक नेते उत्सुक असतात, पण हेच गुन्हेगार अडचणीत सापडले की सर्वजण हात वर करतात. असाच प्रकार कोथरूडमधील गुन्हेगारी संदर्भात घडताना दिसत आहे. कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळच्या वाढत्या अडचणींमुळे अनेक नेत्यांची नावे आणि त्याचे ग्रामीण कनेक्शन आता पुढे येत आहेत.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि भाजप नेत्यांची चुप्पी
निलेश घायवळचे सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. महायुतीतीलच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट महायुतीतील चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे या प्रकरणावर मौन बाळगत आहेत. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यास ते फक्त हात जोडून पुढे सरकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> चंद्रकांत पाटील म्हणाले तिला उचलायचं की नाही? आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया समोर
वास्तविक पाहता, या गुन्हेगारीची सुरुवात कोथरूड परिसरातून झाली, तरी स्थानिक नेते याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाहीत. कोथरूडमधील वाढती गुन्हेगारी आता राज्यभर पसरली असताना जबाबदारी घेऊन ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे. मात्र, त्याऐवजी या मुद्याकडे दुर्लक्ष करून चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील यांच्या वादाकडे मोर्चा वळवला होता.
यानंतर पत्रकार परिषदेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. "निलेश घायवळ प्रकरणात डीसीपींना फोन का केला नाही?" या प्रश्नावरही त्यांनी उत्तर देणं टाळलं. सर्वांच्या अपेक्षा होत्या की चंद्रकांत पाटील काहीतरी ॲक्शन घेतील, ठोस भूमिका मांडतील; परंतु त्यांनी मौनच पत्करलं आहे.