‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. (11 Dies of Heat Stroke after Maharashtra Bhushan Award Event)
ADVERTISEMENT
रुग्णांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “नागपूरवरून आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. आम्ही थेट इथे आलो. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांची भेट घेतली. त्यांच्याशी आम्ही बोललो. मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ… कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन. ही घटना दुर्दैवी आहे.”
‘अमित शाहांना सायंकाळी गोव्यात कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम सकाळी ठेवण्यात आला आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलं? कोणत्या स्तरावरची चौकशी झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.”
हे वाचलं का?
रुग्णांच्या भेटीनंतर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं
अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, तो फार महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना द्यायचा निर्णय झाला, तिही समाधानाची बाब होती. पण, हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं? हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. एक काळा डाग त्याला बसला आहे. अजूनही किती लोक मृत्यूमुखी पडली आहेत, हे निश्चितपणे पुढे येत नाहीये.”
हेही वाचा >> ‘सच्चा समाजसेवकापुढे तुम्हाला झुकावचं लागलं…’, उद्धव ठाकरेंचा अमित शाहंना टोला
“कोरोना काळात आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, तेव्हा ते स्वतः सांगायचे की कोरोनाचा कुठलाही आकडा लपवायचा नाही. जे काही घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डी.वाय. पाटील आणि टाटा रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. आधी सांगितलं की, संख्या खूप मोठी होती. अफवांचे पेव जास्त फुटलं. वज्रमूठ सभेत कुणी म्हणत होते की, 20 पर्यंत आकडा गेला. काहीजण म्हणत शेकड्यांनी लोक गंभीर आहेत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी
“ज्यावेळी आम्ही इथे पुरूष आणि महिलांना बोललो, तेव्हा बहुतेक जण पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा वगैरे भागातील दिसले. त्यांनी सांगितलं की, आमच्या पोटात काही नव्हतं. काहींनी सांगितलं की, आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्र अतिशय होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असं काही जण सांगत आहेत. काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली.
ADVERTISEMENT
“लोणावळ्यातील एक भगिनी भेटली होती. तिने सांगितलं की, तीन चार गाड्या आल्या होत्या. त्यातून कार्यक्रमाला आलो. काही जण 15 एप्रिलला रात्री इथे आलेले होते. मी त्यांना विचारलं की, अंघोळी वगैरे कुठे केल्या, तर त्यांनी सांगितलं की, काही केलं नाही. शौचालयाची व्यवस्था होती, असं त्यांनी सांगितलं”, असंही पवार म्हणाले.
हेही वाचा >> महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?
“उन्हाळा प्रचंड आहे आणि असं असताना दुपारची वेळ निवडणं, हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. चूक दुरुस्त वगैरे चर्चा करून चालणार नाही. मृत्यू झालेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. जे उपचार घेताहेत ते लवकर बरे होवोत. आतापर्यंत किती जखमी आहेत, किती उपचार घेताहेत, किती लोकांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडलं, किती जण मृत्यूमुखी पडलेत, हा निश्चित आकडा कळायला मार्ग नाही. या कार्यक्रमाची वेळ चुकली. संध्याकाळची असती, तर अधिक बरं झालं असतं. एप्रिल मे मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत”, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT