Maharashtra Bhushan : अखेर ओळख पटली, मृत्यू झालेले 13 श्री सदस्य कोण?
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यू झालेल्या 13 जणांमध्ये 9 महिला व 4 पुरुष आहेत. तर 12 व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उपस्थितांपैकी 13 जणांच्या मृत्यूने संपूर्ण कार्यक्रमालाच गालबोट लागलं आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमामुळे 13 जणांना उन्हाचा फटका बसला आणि जीव गमावावा लागल्याने राजकारणही तापलं आहे. मृत्यू झालेल्या काही श्री सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित मृत श्री सदस्यांची ओळख पटली असून, त्यांनी नावे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 16 एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर झालेल्या मृत्यूकांडाने खळबळ उडाली.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
रखरखत्या आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात कार्यक्रम घेण्यात आला आणि 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. काही जणांचा 16 एप्रिल रोजीच मृत्यू झाला, तर काही जणांचा 17 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख आता पटली असून, प्रशासनाने सर्वांची नावे जाहीर केली आहेत.
मृत्यू झालेल्या 13 श्री सदस्यांमध्ये 9 महिला व 4 पुरुष आहेत. तर 12 व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. 35 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.