ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन! कोल्हापूर ते केंब्रिज प्रवास... कशी होती संपूर्ण कारकीर्द?
Jayant Narlikar: जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जयंत नारळीकर यांचं आज पहाटे निधन

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jayant Naralikar Passed Away : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकर हे भारतातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि विज्ञान कथाकार आहेत. त्यांना खगोल शास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य संशोधकांपैकी एक मानलं जातं. त्यांनी विश्वाच्या उत्पत्ती, गुरुत्वाकर्षण आणि काळ-प्रकाशाच्या परस्परसंबंधांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.
केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये PHD
जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. तर त्यांची आई सुमती नारळीकर संस्कृत विद्वान होत्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरण मिळाले.
हे ही वाचा >> छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?
जयंत नारळीकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पूर्ण केलं. त्यानंतर, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये पीएच.डी. मिळवली. त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल होते.
हॉयल-नारळीकर सिद्धांत...
जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत मिळून "हॉयल-नारळीकर सिद्धांत" विकसित केला. विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षण यांच्याशी संबंधित हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत स्थिर अवस्था विश्वरचनेच्या (Steady State Cosmology) आधारावर आहे. जयंत नारळीकर यांनी खगोलभौतिकी, गुरुत्वाकर्षण, आणि विश्वरचनाशास्त्र यांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं.
हे ही वाचा >> शेजाऱ्यांचा वाद विकोपाला, चाकू- कोयते काढले, गुप्ता आणि शेख कुटुंब भिडलं, तिघांचा मृत्यू... प्रकरण काय?
जयंत नारळीकर यांनी भारतात परतल्यानंतर टाटा संशोधन संस्थेत (TIFR) काम केलं. त्यांनी पुण्यात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची स्थापना केली. IUCAA हे आज खगोलशास्त्र संशोधनाचं प्रमुख केंद्र आहे.
जयंत नारळीकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत विज्ञानकथा आणि वैज्ञानिक साहित्य लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुस्तकांमुळे विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. यक्षांची देणगी, व्हायरस, कालसर्प, आणि द स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स हे त्यांच्या लेखणीतून उतरलेले खास साहित्य आहे.
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार
जयंत नारळीकर यांनी लोकांमध्ये आणि विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल लोकप्रियता निर्माण व्हावी यासाठी अनेक व्याख्यानं दिली. विशेषतः तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
नारळीकर यांचा विवाह गणितज्ञ असलेल्या मंगला यांच्याशी झाला होता. त्यांना तीन मुली आहेत. त्यांनी आपलं जीवन विज्ञान, शिक्षण आणि साहित्य यांना समर्पित केलं. जयंत नारळीकर यांचे वैज्ञानिक संशोधन, लेखन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे ते भारतातील विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जातात. त्यांच्या कार्यामुळे फक्त खगोलशास्त्रातच नाही, तर विज्ञानाच्या सामाजिक प्रसारातही महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे.