6 वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले, दाताने धरून फरफटत नेलं, थरकाप उडवणारा CCTV
Dombivali Dog Video : मुलगा मदतीसाठी ओरडत होता. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना पाहिली आणि धावत येऊन कुत्र्यांना दगड मारून पळवलं.

बातम्या हायलाइट

डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला

कुत्र्यांनी घेरून चिमुकल्याचे लचके तोडले

रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तिमुळे वाचले प्राण
डोंबिवली : डोंबिवलीतील मोठागांव परिसरात आवारा कुत्र्यांचा हैदोस वाढत असल्याची दिसतंय. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक 6 वर्षीय मुलावर पाच कुत्र्यांनी हल्ला करून, त्याला गंभीर जखमी केलं. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कुत्री मागे लागले म्हणून पळताना पडला आणि...
लहान मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तो पोहोचला. तिथे एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलगा घाबरून खाली पडला आणि त्याचवेळी आणखी चार कुत्रे धावत येऊन त्याच्यावर तुटून पडले. कुत्र्यांनी मुलाच्या हातापायांना ठिकठिकाणी चावा घेतला. तर एका कुत्र्याने त्याची पँट तोंडात धरून त्याला ओढलं.
मुलगा गंभीर जखमी
मुलगा मदतीसाठी ओरडत होता. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना पाहिली आणि धावत येऊन कुत्र्यांना दगड मारून पळवलं. त्यामुळे मुलाची सुटका झाली, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता आणि उभा राहण्याच्या अवस्थेतही नव्हता.
या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की, या परिसरात आवारा कुत्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, पण महानगरपालिकेचे आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, लवकरात लवकर या कुत्त्यांवर नियंत्रण आणावे, जेणेकरून लहान मुले आणि वृद्धांची सुरक्षा राखली जाईल.