हुरहूर वाढली! आज दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, एक वाजता जाहीर होणार निकाल
दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही हुरहूर वाढली असेल. आज दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आज 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हुरहूर वाढली!
आज दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
एक वाजता जाहीर होणार निकाल
Maharashtra SSC Board 10th Result : आज (8 मे) दहावीचा निकाल. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही हुरहूर वाढली असेल. आज दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आज 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर आकडेवारी जाहीर केली जाईल. यावर्षी राज्यभरातून एकूण 16, 15, 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,65, 740 मुलं, 7,49,736 मुली आणि 13 तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.
'इतक्या' केंद्रांवर पार पडली परीक्षा
राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकूण 5,111 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव या माहितीचा वापर करावा लागेल. संकेतस्थळावर विषयनिहाय गुण पाहण्यासोबतच विद्यार्थ्यांना आपली तात्पुरती गुणपत्रिकाही डाऊनलोड करता येईल. तसेच डिजीलॉकर (DigiLocker) या ॲपच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल.
हे ही वाचा : Maharashtra SSC Class 10 result: मोठी बातमी.. दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर, 'ही' आहे लिंक
'असा' पहा निकाल
निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 'SSC Result 2026' या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आपला बैठक क्रमांक आणि आईच्या नावाचे पहिले काही अक्षरे टाकून सबमिट करावे. स्क्रीनवर निकाल दिसल्यानंतर तो व्यवस्थित तपासून त्याची प्रिंट काढून ठेवावी. 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. जे विद्यार्थी या निकषात बसतील त्यांना पुढील शिक्षणासाठी पात्र ठरवले जाईल.
हे ही वाचा : समजून घ्या: सत्ता स्थापनेवेळी बहुमत सिद्ध करायला राज्यपाल सांगू शकतात? विजयची अडवणूक योग्य की अयोग्य?
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी
जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी बोर्डातर्फे पुन्हा एकदा परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल शंका असेल किंवा जे मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, ते गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेनंतर जर विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ झाली, तर त्यांना सुधारित गुणपत्रिका दिली जाईल.









