महाराष्ट्र दिन विशेष: जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं, काय आहे नेमका इतिहास?
महाराष्ट्र दिन म्हटलं की, ‘जय जय महाराष्ट्र माझा’हे गाणं असं जणू समीकरणच बनलं आहे. जाणून घ्या या गाण्याचा नेमका इतिहास काय आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि चैतन्य निर्माण करणारे गीत महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला. पण हे गाणं नेमकं लिहिलं कोणी, त्याचा नेमका इतिहास काय हेच आपण आज म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया.
जय जय महाराष्ट्र म्हटलं की, शाहीर साबळे हे नाव आपसूकच आपल्या तोंडी येतं. आपल्या पहाडी आवाजात अवघ्या मराठी मनामध्ये स्फूरण पेटवणाराचा हा आवाज होता. पण त्याशिवाय या अजरामर गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याला नेमकं संगीत कोणी दिलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे का?
हे ही वाचा>> Maharashtra Day 2025: द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes
कवी राजा नीळकंठ बढे यांनी लिहिलेल्या या गीताला श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले असून, शाहीर कृष्णराव साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात गायले आहे. या गीताने मराठी मनावर अधिराज्य गाजवले असून, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
मराठी मनाला चेतवणारा गीतकार कोण?
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत प्रसिद्ध मराठी कवी राजा नीळकंठ बढे (1912-1977) यांनी लिहिले आहे. मुंबईतील आकाशवाणीवर काम करताना त्यांनी मराठी अस्मितेला चालना देण्यासाठी हे स्फूर्तिदायी गीत लिहिले होते. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या निमित्ताने आकाशवाणीवर प्रसारित करण्यासाठी या गीताची रचना झाली होती. राजा बढे यांनी या गीतात महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, आणि मराठी माणसाचा अभिमान शब्दबद्ध केला आहे.
गीताचे संगीत आणि गायक
दरम्यान, या गीताला संगीत दिलेले ते आहे प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. त्यांनी गीताला स्फूर्तिदायी आणि उत्साहवर्धक चाल देत मराठी माणसाच्या मनातील जोश जागवला.
हे ही वाचा>> Maharashtra Day: 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र कसं बनलेलं वेगळं राज्य, तुम्हाला माहितीए का महाराष्ट्राची ही रक्तरंजित कहाणी?
तर मराठी मनावर अधिराज्य गाजवणारं हे गाणं लोककलाकार आणि शाहीर कृष्णराव साबळे (1923-2015) यांनी गायलेलं. शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गाऊन त्याला अजरामर केलं. 1 मे 1960 रोजी मुंबईत महाराष्ट्र राज्याच्या स्थापना सोहळ्यात शाहीर साबळे यांनी हे गीत प्रथम गायलेलं. त्यांच्या गायनाने हे गीत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुंजी घालू लागलं.
गीताचा इतिहास आणि महत्त्व
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशाचे प्रतीक आहे. 1 मे 1960 रोजी 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि मराठी अस्मितेला प्रोत्साहन देण्यासाठी हे गीत रचले गेलेसे. गीतातील ओळी, जसे की “भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा” आणि “सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा,” मराठी माणसाच्या निर्भय आणि स्वाभिमानी स्वभावाचे दर्शनच या गीतातून घडतं.
या गीताने मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान आणि एकतेची भावना निर्माण केली. शाहीर साबळे यांच्या नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट बनवून शाहीर साबळे यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यातही या गाण्याचा समावेश करण्यात आला होता.
जय जय महाराष्ट्र माझा.. हे संपूर्ण गाणं..
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा