Maharashtra Weather: महाराष्ट्रावर पावसाचा स्ट्राईक, नाशिकमध्ये गारपीट तर मुंबईसाठी येलो अलर्ट.. असं असेल हवामान!
Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात आज (14 मे) देखील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. तसंच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
14 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
पाहा कुठे-कुठे बरसणार अवकाळी पाऊस
मुंबईसह कोणत्या जिल्ह्याला देण्यात आला येलो अलर्ट?
मुंबई: महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, आज (14 मे) रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज जारी केलेल्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही वादळी वारे (40-50 किमी प्रतितास) आणि पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज
मुंबई आणि आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने उद्यासाठी मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 14 मे रोजी या भागात 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा>> पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!
मराठवाडा आणि विदर्भात तीव्र हवामानाची शक्यता
मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 14 मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही पुढील दोन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती?
कोकण किनारपट्टीवरही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या घाट परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांना यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहराला उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.










