मुंबईची खबर : मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा विशेष ब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

मुंबई तक

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर 15 दिवसांसाठी विशेष ब्लॉक असणार आहे. या दरम्यान मध्य रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Central Railway Special Block
Central Railway Special Block
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा विशेष ब्लॉक

point

कसं असेल वेळापत्रक?

Central Railway Special Block : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील टिटवाळा स्थानकात 15 डबा लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक आणि पॉवर ब्लॉकमुळे 28 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत सलग 15 रात्री प्रवाशांना सेवा विस्कळीत होण्याचा सामना करावा लागणार आहे. या ब्लॉकच्या पहिल्या टप्प्याला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून तो 2 सप्टेंबरपर्यंत चालेल. या काळात दररोज रात्री 11.30 ते पहाटे 5.10 या वेळेत कल्याण ते वाशिंद दरम्यान अप आणि डाऊन उत्तर-पूर्व (नॉर्थ ईस्ट) मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाईल. या काळात गाड्यांच नेमकं वेळापत्रक काय असणार आहे, जाणून घ्या सविस्तर.

अनेक लोकल फेऱ्या रद्द

पहिल्या टप्प्यात रात्री उशिरा आणि पहाटे टिटवाळा ते कसारादरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. 28 ऑगस्टच्या रात्री सीएसएमटी-टिटवाळा आणि सीएसएमटी-कसारा दरम्यानच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सीएसएमटीवरून रात्री 8.56 वाजता सुटणारी आसंगाव लोकल टिटवाळ्यापर्यंतच चालवली जाईल, तर डोंबिवली आणि कल्याण येथून रात्री 10 वाजताच्या सुमारास सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल ठाणे स्थानकातच शॉर्ट-टर्मिनेट केल्या जातील. ब्लॉकपूर्वी कसाऱ्यासाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री 10.47 वाजता सुटेल, तर ब्लॉकमध्ये कसारा-सीएसएमटी ही पहिली लोकल पहाटे 3.51 वाजता कसाऱ्यावरून सुटेल.

हे ही वाचा : उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

एसी लोकल सेवांवरही परिणाम

29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पुढील दिवसांत अतिरिक्त फेऱ्या रद्द आणि शॉर्ट-टर्मिनेट करण्याचे नियोजन आहे. या काळात टिटवाळ्यापर्यंत जाणाऱ्या सर्व लोकल सेवा आसंगावपर्यंत वाढवण्यात आल्या असून टिटवाळातून सुरू होणाऱ्या गाड्या आसंगाववरून सोडल्या जातील; तर काही फेऱ्या ठाणे किंवा कल्याणपर्यंतच मर्यादित राहतील. तसेच, दिवसा धावणाऱ्या एसी लोकल सेवांवरही याचा परिणाम होईल. सकाळी 6.30 ची सीएसएमटी-टिटवाळा एसी लोकल आणि दुपारी 3.33 ची दादर-टिटवाळा एसी लोकल केवळ ठाण्यापर्यंतच धावेल. टिटवाळा मार्गावरील इतर अनेक फेऱ्या ठाणे किंवा कल्याण स्थानकातच शॉर्ट-टर्मिनेट आणि ओरिजिनेट केल्या जाणार आहेत.

हे ही वाचा : हॉटेलमध्ये एक तरुणी अन् दोन तरुण, 18 लाखांचा व्यवहार अन् पोलीस पोहोचले!

लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

या ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे. गोरखपूर-दादर आणि बलिया-दादर एक्स्प्रेस ठराविक रात्री वाशिंद किंवा आटगाव स्थानकात रोखून (रेग्युलेट) ठेवल्या जातील. याव्यतिरिक्त ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल आणि मऊ-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या मुंबईत 10 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 15 दिवसांच्या काळात मध्य रेल्वेने प्रवाशांना वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.