नाशिक : नवऱ्याने प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो दाखवले, मासिक पाळी येत नसल्याने टोमणे; लग्नाच्या 6 महिन्यानंतर नवविवाहितेची आत्महत्या
नाशिकमध्ये एका नववाहितेने लग्नाला केवळ 6 महिने झाले असताना आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी पीडितेने सुसाईड नोटसुद्धा लिहिली असून त्यामध्ये तिने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशकात लग्नाच्या 6 महिन्यानंतर नवविवाहितेची आत्महत्या
नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् सासरच्या लोकांचे टोमणे...
Nashik Suicide Case: नाशिकच्या हिरावाडी परिसरात एका नववाहितेने लग्नाला केवळ 6 महिने झाले असताना, विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत महिलेचं नाव नेहा पवार असून तिच्या सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पती, सासू आणि नणंदेकडून होत असलेल्या मानसिक छळाला वैतागून महिलेने आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी पीडितेने सुसाईड नोटसुद्धा लिहिली असून त्यामध्ये तिने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
भावाला सुसाईड नोटचे फोटो पाठवले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने काल म्हणजेच बुधवारी (26 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजताच्या सुमारास विष प्राशन केलं. त्यानंतर, तिच्या पतीने तिला रुग्णालयात सुद्धा नेलं मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पीडित नेहाने आत्महत्या करण्यापूर्वी सात पानांची चिट्ठी लिहिली होती. इतकेच नव्हे तर, सासरचे लोक चिठ्ठी गायब करतील या भीतीने तिने तिच्या भावाला व्हॉट्सअॅपवरून सुसाईड नोटचे फोटो पाठवले होते.
माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, महिलेच्या माहरेच्या लोकांनी 15 लाख रुपये खर्च करून तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, तरीसुद्धा तिला सासरचे लोक माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव आणायचे. इतकेच नव्हे तर, घरच्यांच्या सांगण्यावरून तिने तिच्या आई-वडिलांकडून 20 हजार रुपये आणि भावाची गाडी सुद्धा आणून दिली होती. पीडितेची मोठी फसवणूक झाल्याचं तिने चिट्ठीत लिहिलं.
हे ही वाचा: मुंबई: "आईनेच त्याच्यासोबत मिळून मला वेश्या व्यवसायात ढकललं", मुलीने शिक्षिकेला सगळंच सांगितलं अन्...
पीडितेच्या चारित्र्यावर संशय
महिलेने सुसाईड नोटमध्ये पतीवर आरोप करत लिहिलं की, "लग्नापूर्वी माझ्या नवऱ्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. इतकेच नव्हे तर नवऱ्याने तिला त्या मुलीचे अश्लील फोटो सुद्धा दाखवले होते. तसेच, माहेरी तुझा कोणी यार ठेवला असेल, म्हणून सारखी माहेरी जाते असं सतत बोलून माझा नवरा माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सुद्धा सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला. माझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. लग्न झाल्यापासून नवऱ्याने मला दोनदा मारहाण केली. आजारी असतानाही माझ्याकडूव काम करून घ्यायचे. नणंदा टोमणे मारायच्या आणि नवऱ्याला तसेच सासूला माझ्याबद्दल खोटंनाटं सांगायच्या. लग्नानंतर नवऱ्याने देखील कौमार्य भंगाचे रक्त का आले नाही म्हणून संशय घेतला होता." असे नेहाने आपल्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करत सुसाईड नोट लिहिली आहे.










