पालघर : मॅरेथॉनमध्ये धावून तिसरा क्रमांक पटकावला, पण लगेच ह्रदयविकाराचा झटका आला,15 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू
Palghar News : मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या रोशनी रमेश गोस्वामी (वय 15) या दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच रोशनीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पालघर : मॅरेथॉनमध्ये धावून तिसरा क्रमांक पटकावला
पण लगेच ह्रदयविकाराचा झटका आला,15 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू
Palghar News : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणांतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. क्रीडा स्पर्धेत यश मिळवूनही क्षणार्धात आयुष्य संपल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.
मॅरेथॉनमध्ये धावून तिसरा क्रमांक पटकावला, पण लगेच ह्रदयविकाराचा झटका आला
रोशनी रमेश गोस्वामी (वय 15) ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने ही शर्यत पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धा संपल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र, काही वेळातच रोशनीला अस्वस्थ वाटू लागले. तिला चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शाळेतील शिक्षक व क्रीडा स्पर्धेचे आयोजकांनी तातडीने रोशनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोशनीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या अकाली निधनाने उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला.
हेही वाचा : बायकोचा पराभव जिव्हारी अन् विजयी नगरसेविकेच्या पतीला सुपारी देऊन संपवलं; मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा
रोशनीच्या जाण्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
प्राथमिक माहितीनुसार, मॅरेथॉनमध्ये धावल्यामुळे शरीरावर आलेल्या ताणामुळेच हा हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय तपासणी व अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला अचानक हृदयविकाराचा झटका येणे ही गंभीर बाब मानली जात असून, यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांमधील आरोग्य तपासणी आणि खबरदारीच्या उपायांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.










